संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हटके जनजागृती

लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जरा हटके पद्धतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले. कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून ‘आम्ही मतदान करणार, आम्ही मतदार’ असे फलक झळकावून मतदारांना आकर्षित करण्यात आले.

लोकांनी जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली होती. पण निसर्ग आणि पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मतदारांना आवाहन करण्यासाठी निवडणूक अधिकारी गीतांजली शिर्पे आणि  रेवती घोलप यांनी वापरलेली शक्कल सर्वांच्याच आकर्षणाचा विषय बनली होती. चक्क कृत्रिम प्राण्यांचा आधार घेण्यात आला होता. माकड, जिराफ, हरण या प्राण्यांकडे ‘मी मतदान करणार, मी मतदार’ अशा आशयाचे फलक देऊन नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. नागरिकांना ही अभिनव संकल्पना पसंतीस पडली. मोठय़ा संख्येने आदिवासी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.