जिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागामध्ये ठेकेदाराचे पैसे आणि चलन एका शिपायाने प्रत्यक्ष बँकेत न भरता बँकेचा पैसे भरल्याचा बँकेचा बनावट शिक्का मारून ते चलन बांधकाम विभागामध्ये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित शिपाई कर्मचाऱ्याला विचारणा करून नोटीस बजावण्यात आली आहे.
बांधकाम विभागामध्ये निविदा मंजूर झाल्यानंतर त्याची अनामत रक्कमही जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या चलनाद्वारे ठेकेदार ती रोखीने बँकेत भरतो. उत्तर बांधकाम विभागामध्ये कार्यरत असलेला शिपाई हा ठेकेदारांशी संगनमत करून काही कामे करून देतो. ठेकेदारदेखील त्यांची काही पैशांची कामे शिपायामार्फत करतात. बँकेमध्ये चलन भरण्यासाठी संबंधित चलन आणि रोखीचे पैसे या शिपायाकडे एका ठेकेदाराने दिले होते. मात्र, हे पैसे प्रत्यक्ष बँकेत न भरता या शिपायाने बँकेचा सहीशिक्का संबंधित चलनावर मारून ते चलन परस्पर बांधकाम विभागाच्या फाईलमध्ये जोडून दिले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला विचारणा करण्यात आली, तेव्हा बांधकाम विभागातील शिपायानेच हा प्रताप केल्याचे उघडकीस आले. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने चलने दिली जातात आणि बँकेमध्ये अनामत रक्कम भरली जाते. त्यामुळे अशा प्रकारची किती चलने प्रत्यक्षात बँकेत पैसे न भरता बनावट सही शिक्के मारून जिल्हा परिषदेकडे जमा केली किंवा कसे हा मोठा विषय आता उपस्थित झाला आहे. या प्रकरणी संबंधित शिपायाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कार्यकारी अभियंता यांनीदेखील विचारणा केली. बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे. त्यानंतर सही-शिक्का असलेली चलने यांची आता पडताळणी केली जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले.