कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात धरणे आंदोलन! सांगली, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्येही आंदोलन

कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी महाधरणे आंदोलन करण्यात आले. फक्त एका जिल्ह्यातच विरोध असल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या आंदोलनातून शेतकऱ्यांनी उघडे पाडले. कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून, आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा या सहा तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनात बोलताना समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, ‘शेतकरीविरोधी, पर्यावरण विरोधी कंत्राटदारांचे खिसे भरणारा व भ्रष्टाचारयुक्त असा शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठी मंत्रिमंडळ काम करत आहेत. महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे हे खोटे आहे. आज दहा जिल्ह्यांतील आंदोलनाने मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून त्यांनाच उघडे पाडले आहे. जिल्ह्यात दोन मंत्र्यांनी सर्वपक्षीय, शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा. गावागावांत बैठका घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करून, एजंट गावात घुसल्यास त्यांना कोल्हापुरी भाषेत प्रसाद द्या. शक्तिपीठ महामार्गाचा निर्णायक निकाल लागत नाही, तोपर्यंत आंदोलन सक्रिय ठेवूया असे ठरवण्यात आले. यावेळी शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, श्यामराव पाटील, सुरेश संकपाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच बैठक घेतली जाईल. तसेच आजचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

■ सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-गोवा या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असून, सक्तीने भूसंपादन करण्याचा शासनाने प्रयत्न केल्यास आम्ही नक्षली बनून अधिकाऱ्यांना गोळ्या घालू किंवा रुमणाने ठोकून काढू, असा इशारा बार्शीतील शेतकऱ्यांनी दिला आहे. जुन्या जिल्हाधिकाऱ्याजवळील पूनम गेटजवळ बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

चुकीचा प्रसार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा

■ यावेळी आंदोलनस्थळी निवेदन देताना, समन्वयक गिरीश फोंडे यांनी कोल्हापुरातून महामार्ग रद्द केल्याबद्दल अभिनंदन करत, पण हा महामार्ग पर्यायी कसा जाणार आहे याचे नोटिफिकेशन काढा, अशी मागणी केली. तसेच आपल्या भुदरगड मतदारसंघात काही एजंट हे महामार्ग पाहिजे असा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर जरब बसवा, अशीही मागणी केली. यावर बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपण महामार्ग रद्दचे आपले काम केले आहे. महामार्ग करा असा चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे सांगितले.