मारकडवाडीतून रणशिंग फुंकणार, मुंबईत ईव्हीएम अरबी समुद्रात बुडवले तर धुळ्यात अंत्ययात्रा काढली

‘ईव्हीएम’विरोधात मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा भडका आता राज्यभर उडाला असून, ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मुंबईत शिवसेनेने ईव्हीएमला अरबी समुद्रात बुडवून जलसमाधी दिली, तर धुळ्यात ईव्हीएमची अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारकडवाडीला आज भेट दिली. मारकडवाडीच्या लोकांनी लोकशाही वाचवण्याची लढाई सुरू केली आहे. इथूनच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जनआंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, असे पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ईव्हीएममध्ये मोठा झोल झाला. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार आले. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीने ईव्हीएमविरोधात पहिला आवाज उठवला आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची तयारी केली. सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करून बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया होऊ दिली नाही. मात्र, राज्यभरात ईव्हीएमविरोधात संतापाची लाट दिवसेंदिवस वाढत आहे. महाविकास आघाडीचे नेते मारकडवाडीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत.

…तर मीही राजीनामा द्यायला तयार

निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार, असे आदेश काढावे. त्यानंतर मी आणि उत्तम जानकर राजीनामा द्यायला तयार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. मारकडवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते. नागरिकांच्या मतांचा अधिकार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात असून मारकडवाडीच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागले आहे. येथील ग्रामस्थांनी लोकशाही वाचविण्याची लढाई उभारली आहे. या लढाईत सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिवेशनानंतर राहुल गांधी या जनआंदोलनात उतरतील असे ते म्हणाले.