धनगर आरक्षणासाठी आंदोलकांनी मारल्या मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या

धनगर आरक्षणाचा जीआर तातडीने काढू असे आश्वासन देऊन मिंधे सरकारने तोंडाला पाने पुसल्याने आज धनगर समाज आक्रमक झाला. धनगर आंदोलकांनी थेट मंत्रालयावर धडक देत तेथील संरक्षक जाळ्यांवर उड्या घेत आंदोलन केले. त्याचप्रमाणे दुसऱ्या मजल्यावर आणि तळमजल्यावरील त्रिमूर्ती प्रांगणात ठिय्या दिला. यावेळी त्यांची पोलिसांबरोबर झटापटही झाली. त्यामुळे काही काळ मंत्रालयात तणावपूर्ण वातावरण होते.

धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून (एसटी) आरक्षण देऊ नये अशी भूमिका आदिवासी आमदारांनी घेतली आहे. या मागणीसाठी विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी दोन दिवसांपूर्वी आदिवासी आमदारांसह मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या घेऊन आंदोलन केले होते. त्यानंतर धनगर समाज अधिक आक्रमक झाला असून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयात घुसून आंदोलन केले.

धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंधरा दिवसांत जीआर काढण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. त्यातच एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आज तीन आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळ्यांवर उड्या घेतल्या.

पोलिसांनीही जाळीवर उतरून आंदोलकांची समजूत काढून त्यांना बाहेर काढल्यानंतर आंदोलकांनी दुसऱ्या मजल्यावर ठिय्या दिला. तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीसह आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याने धनगर आरक्षणप्रश्नी प्रस्तावित बैठकही होऊ शकली नाही. त्यामुळेही आंदोलकांनी संताप व्यक्त केला.