भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची गरळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यातून भारतीय जनता पक्षाने आपले खरे रुप दाखविले असून, संविधान बदलाच्या संदर्भात या सरकारची भूमिका यामुळे स्पष्ट झाली आहे. संघ परिवाराशी नाळ जोडलेल्या या सरकारचा चेहरा यानिमित्ताने समोर आला असून, गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
देशभरात काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील अवमानकारक विधानासंदर्भात राज्यात ठिकठिकाणी पत्रकार परिषदा होत आहेत. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चेन्नीथला म्हणाले की, हे सरकार संघाच्या तालावर नाचते. मनुवादी प्रवृत्तीच्या या सरकारने चारसो पार चा नारा दिला. मात्र देशातील जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिलेले नाही. अन्य पक्षांच्या कुबड्या घेत ते सरकार स्थापन झाले. हे सरकार संविधान बदलण्याच्या मनस्थितीत असून, गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन त्याला पुष्टी दिली आहे. तसेच याबाबत त्यांनी केलेला खुलासा हस्यास्पद असल्याचे चेन्नीथला यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील बीड व परभणी येथील घटना चिंताजनक असून, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची परभणीत आले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. केंद्रातील व राज्यातील सरकारच्या विरोधात येणार्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असून गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात येणार आहे. आजपासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगून संसदेच्या परिसरात झालेले आंदोलन हा त्याचाच एक भाग होता. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस देशातील संविधानाचे रक्षण करुन ते बदलू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
परभणीच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेला खुलासा संतापजनक असून, मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला असताना त्याचा मृत्यू श्वसनाच्या त्रासाने झाला, अशी दिशाभूल करणारी माहिती सरकारने दिली, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्याच्या ज्याप्रमाणे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली, त्याचप्रमाणे परभणीच्याही पोलीस अधीक्षकांची बदली झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या.