भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव उधळून लावू ! पालिका प्रशासनाविरोधात शिवसैनिकांनी केले जोरदार आंदोलन

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बोरिवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. पालिका प्रशासनाचा हा डाव उधळून लावण्यासाठी मंगळवारी शिवसेना विभाग क्र. 1 आणि म्युनिसिपल कामगार सेना यांच्यावतीने भगवती रुग्णालयाच्या आवारात जोरदार आंदोलन करण्यात आले.

गोरेगाव ते पालघर, मीरा-भाईंदरपासून वापीपर्यंत गरीब आदिवासी व मध्यमवर्ग यांना कमी दरात उपचार देणारे भगवती हे उत्तर मुंबईतील एकमेव रुग्णालय आहे. बोरिवली रेल्वे स्टेशन येथील बॉम्बस्पह्ट, 2005 साली अतिवृष्टी तसेच कोविड कालावधीत भगवती रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारिकांनी येथील नागरिकांना उत्तम उपचार व सुविधा दिली. परंतु पालिकेने अर्थसंकल्पात भगवतीचे पीपीपी तत्त्वावर प्रचलन आणि पर्यवेक्षण करण्याची जाहीर केले असून त्यामुळे रुग्ण सेवा व उपचार महागणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग क्र. 1 आणि म्युनिसिपल कामगार सेना यांच्यावतीने मंगळवारी भगवती रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले.

यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर, हर्षद कारकर, योगेश भोईर, विधानसभा प्रमुख संजय भोसले, बाळकृष्ण ढमाले, अशोक म्हामुणकर, शरयू भोसले, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मिलिंद साटम, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे युनियन उपाध्यक्ष संजय कांबळे, चिटणीस संजय वाघ, महेश गुरव, वृषाली परुळेकर, स्थानिक युनिट पदाधिकारी सचिन सांगळे, जगदीश चव्हाण, प्रकाश दळवी, शिल्पा राऊत, मीना राजपूत उपस्थित होते.

अन्यथा तीव्र आंदोलन करू

उत्तर मुंबईतून सर्वात जास्त कर महापालिकेला मिळतो. अशा वेळी येथील नागरिकांना विनामूल्य अथवा कमी दराने आरोग्य सेवा महापालिकेने उपलब्ध करून  दिल्या पाहिजेत. महापालिकेने सदर धोरण व निविदा रद्द कराव्यात. तसेच मुंबई महापालिकेने भगवती रुग्णालयाचे प्रचलन व परिरक्षण करून येथील गोरगरीब व मध्यमवर्गीय  नागरिकांना आरोग्य सेवा द्यावी.पालिकेने जबरदस्तीने खासगीकरण करण्याचा घाट घातल्यास प्रसंगी उग्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी दिला.