नेस वाडिया महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात गुन्हा दाखल करताना संस्थाचालकासह ट्रस्टींनी वेळखाऊ भूमिका घेतली. याप्रकरणी ट्रस्टी आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख गजानन थरपुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) प्रशांत जगताप यांच्यासह रिपब्लिकन विद्यार्थी सेना, दलित पँथर ऑफ इंडिया, विद्यार्थी विकास मंच सहभागी झाले होते.
वाडिया महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर चौघांनी अत्याचार केला. आरोपींनी ड्रग्जचे सेवन केले होते. कॉलेजचा ट्रस्टी सचिन सानप याला घटनेची माहिती असताना त्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडित मुलीच्या वडिलांवर दबाव टाकून दडपशाही केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने महाविद्यालयाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
संबंधित ट्रस्टी सानप हा मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या अतिशय जवळचा आहे. दबावापोटी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणबाजी करीत अल्पवयीन मुलीला न्याय द्या, वाडिया कॉलेजचा ट्रस्टी सचिन सानप याला आरोपी करा, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करा, अशा घोषणा दिल्या.