एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडवर बुधवारी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा धडक मोर्चा

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील (एआयएएसएल) कंत्राटी कामगारांच्या भवितव्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. बुधवार, 23 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता मेडिकॉन भवन, सहार पोलीस स्टेशनजवळ, एअरपोर्ट गेट नंबर 5, सहार, अंधेरी पूर्व येथून कंपनीवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील देशभरातील 22 हजार युवा फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती व एव्हीएशन कामगार सेनेच्या माध्यमातून व्यवस्थापनाबरोबर सातत्याने मीटिंग घेतल्या. तरीदेखील कामगारांचे प्रश्न सोडवण्यात व्यवस्थापनाला कोणताही रस नसल्याचे व्यवस्थापनाने वारंवार दाखवून दिलेले आहे. मागील भरतीच्या गोंधळाचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांनी दाखवल्यावर व्यवस्थापनाला याचा जाब विचारण्यासाठी खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वात महासंघाचे शिष्टमंडळ फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन गेले होते. यात प्रामुख्याने कायमस्वरूपी नोकरी, पगारवाढ, बढती, अपघाती रजा, ओव्हर टाईम, युनिफॉर्म डिपॉझिट रद्द, चुकीची डी रोस्टर प्रक्रिया, कामगारांना मिळणारी चुकीची वागणूक, कामगार कायद्याची व्यवस्थापनाकडून होणारी पायमल्ली याबद्दल चर्चा करण्यात आली होती.

शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते-आमदार अ‍ॅड. अनिल परब, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे आणि महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातील संलग्न असलेल्या सर्व आस्थापनातील समितीच्या पदाधिकाऱ्यांना व सभासदांना व विभागातील सर्व शाखेतून शिवसैनिकांनी मोर्चासाठी हजर राहावे, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार, महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी केले आहे.

मीटिंगसाठी वेळ देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ

त्यावेळी एआयएएसएलचे महाप्रबंधक जयगोपाल, उप महाप्रबंधक प्रशांत नेवे, मानवी संसाधन विभागाच्या सहाय्यक महाप्रबंधक सुनीता भारद्वाज यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल अशी विनंती करून वेळ मारून नेली. सुनीता भारद्वाज यांनी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्याशी चर्चा करून कामगारांचे प्रश्न मार्गी लावेन असे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर त्यांनी मीटिंगसाठी वेळसुद्धा दिला नाही. व्यवस्थापनाच्या या कार्यपद्धतीचा निषेध करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.