महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव; मराठी भाषिकांमध्ये संताप

भाषिक तेढ निर्माण करणे आणि गट तयार करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या विरोधात हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव माळ मारुती पोलिसांनी पाठविला आहे. यासंदर्भात येत्या 2 एप्रिल रोजी म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस ही शेळके यांना बजावण्यात आली आहे. त्यामुळे सीमा भागात मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी किनये येथे मराठी भाषेतून बोलण्यास मज्जाव करणाऱ्या एका अधिकाऱ्याला जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्याचा शेळके यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांनी शेळके यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर माळ मारुती पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत शेळके यांना अटक केली होती. यामध्ये शेळके यांना जामीन मंजूर झाला. पण कन्नड संघटनाच्या दबावामुळे शेळके यांना हद्दपार करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे सीमाभागात सातत्याने शांतता भंग करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा होत असताना,त्यांना कानडी पोलिसांकडून संरक्षण दिले जात आहे.पण मराठी भाषिकांच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यावर मात्र खोटे गुन्हे दाखल करून, त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार अजूनही सुरूच आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर मार्केट,कॅम्प,माळ मारुती व इतर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. त्यापार्श्वभुमीवर हा हद्दपारचा प्रस्ताव करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.