राज्यातील बिबट्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्येही वाढ होत आहे. वन्यप्राणी तसेच शेतकरी यांच्यातील संघर्ष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची मागणी पुढे आली आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागत असल्याने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल असे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
ऊस तोडल्यानंतर बिबट्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. मग मानवी वस्तीतील कुत्रे, शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार घडतात. आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी हा एक उपाय आहे. त्यासाठी गरज पडल्यास केंद्रीय मंत्र्यांशी चर्चाही करू, असे नाईक म्हणाले.
वर्षभरात 13 वाघांचा मृत्यू
वर्षभरात 13 वाघांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी डुकरांची शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळय़ात अडकल्याने वाघाचा बळी गेला.
वनांमध्ये वनभाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात मिळाली तर त्यावर जगणारे प्राणी वाढतील व शिकारी प्राणी जंगलात राहतील, यासाठी प्रयत्न केले जाणार.
नागपूरच्या प्राणीसंग्रहालयात वाघाच्या झालेल्या मृत्यूचीही चौकशी होत आहे. त्याला बीफऐवजी कोंबडीचे मांस देण्यात आले.