काय सांगता! मुंबई ते दुबई दोन तासांत!! हायस्पीड रेल्वे लिंकचा प्रस्ताव, पाण्यातून धावणार सुसाट ट्रेन

मायानगरी मुंबईहून थेट स्वप्ननगरी दुबई प्रवास केवळ दोन तासांत पूर्ण करता येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रीय सल्लागार ब्युरो लिमिटेडची ही योजना आहे. या योजनेसाठी दुबई ते मुंबई यादरम्यान अंडर वॉटर रेल लिंक प्रस्ताव आहे. जर या प्रस्तावाला दोन्ही देशांकडून मान्यता मिळाल्यास मुंबई ते दुबई हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण केला जाऊ शकतो. मुंबई ते दुबई मार्गावर हायस्पीड ट्रेन समुद्राखालून धावणार असून या हायस्पीड ट्रेनचा वेग ताशी 600 ते 1 हजार किलोमीटरपर्यंतचा असू शकतो. दोन्ही देशांनी पुढाकार घेतला तर या हायस्पीड रेल लिंकला 2030 पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

एका रिपोर्टनुसार, नॅशनल अ‍ॅडव्हायजर ब्युरो लिमिटेडच्या प्रतिनिधित्वाचा दावा करणाऱ्या एका यूट्यूब अकाऊंटनेसुद्धा यासंबंधीचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. यात दाखवले की, रेल लिंक बनवल्यानंतर ही योजना कशी दिसेल. या योजनेसाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करावी लागणार आहे. या रेल लिंकला 600 ते 1 हजार किमी प्रति तास हायस्पीडसाठी डिझाईन करण्यात आले आहे. सध्या मुंबई ते दुबई विमान प्रवासासाठी 3 तास 15 मिनिटांचा वेळ लागतो, तर रेल लिंकने केवळ दोन तासांत हा प्रवास पूर्ण करता येईल. ही योजना पूर्ण झाल्यास दोन्ही देशांतील कच्च्या तेलासह अन्य माल वाहतुकीची देवाणघेवाण करणे आताच्या तुलनेत आणखी सोपे होईल.

6628 किलोमीटरचे अंतर

मुंबई आणि दुबई या दोन शहरांमधील हवाई अंतर जवळपास 1928 किलोमीटर आहे, तर रस्त्यांवरून जायचे असल्यास हे अंतर 6628 किलोमीटरचे आहे. वाहनाने प्रवास करायचा असल्यास किमान 3 दिवस 11 तास लागू शकतात, तर समुद्री मार्गावरून गेल्यास मुंबई ते दुबईसाठी 2179 किलोमीटरचे अंतर आहे. भविष्यात या योजनेला मंजुरी मिळाल्यास दोन्ही देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत होण्यास मदत मिळू शकणार आहे.