मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या कोट्यवधीचा मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्ता धारकांना पालिकेने चांगलाच दणका देत तब्बल 3 हजार 605 मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली आहे. यामध्ये भूखंड, निवासी-व्यावसायिक इमारती, गाळे, औद्योगिक गाळे यांचा समावेश आहे. या कारवाईत पश्चिम उपनगरात सर्वाधिक म्हणजे 1 हजार 767, शहर विभागात 1 हजार 232 तर पूर्व उपनगरातील 606 मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ताधारकांकडे तब्बल 1 हजार 672 कोटी 41 लाख रुपयांची कर थकबाकी आहे. या कारवाई दरम्यान, थकबाकीधारकांनी केवळ 218 कोटी 96 लाख रुपयांचा कर भरणा केला आहे.
कर निर्धारण व संकलन विभागाने सन 2024-25 या आर्थिक वर्षात 6 हजार 200 कोटी रुपये कर संकलन उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यादृष्टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेकडून कलम-203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम 203, 204, 205, 206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीजवस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे. जर मालमत्तेचा उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 2592/2013च्या अंतरिम आदेशान्वये येणारा कर वसूल न झाल्यास मालमलेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटिसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
13 डिसेंबरपर्यंत थकबाकी भरा
मालमत्ता कर भरणा करण्याची पहिल्या सहामाहीची अंतिम देय मुदत शनिवार 13 डिसेंबर 2024 आहे. मालमत्ताधारकांनी या अंतिम देय मुदतीपूर्वी कर भरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तेचा कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
‘टॉप टेन’ बड्या थकबाकीदारांची तिसरी यादी
- मेसर्स सेजल शक्ती रिऍल्टर्स (एफ उत्तर विभाग) 14 कोटी 85 लाख 99 हजार 208 रुपये
- लक्ष्मी कमर्शियल प्रीमायसेस (जी उत्तर विभाग) 14 कोटी 29 लाख 90 हजार 121 रुपये
- मेसर्स एशियन हॉटेल्स लिमिटेड (के पूर्व विभाग) 14 कोटी 18 लाख 92 हजार 302 रुपये
- सहारा हॉटेल्स (के पूर्व विभाग) – 13 कोटी 93 लाख 50 हजार 963 रुपये
- मेसर्स न्यूमॅक ऍण्ड रिओडर जे.व्ही. (एफ उत्तर विभाग) – 13 कोटी 45 लाख 44 हजार 812 रुपये
- मेसर्स फोरमोस्ट रिऍल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (एच पूर्व विभाग) – 12 कोटी 50 लाख 90 हजार 139 रुपये
- श्री साई पवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (के पश्चिम विभाग) – 11 कोटी 69 लाख 45 हजार 058 रुपये
- कमला मिल्स लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – 11 कोटी 47 लाख 25 हजार 130 रुपये
- श्री एल.एन. गडोदिया ऍण्ड सन्स लिमिटेड (एच पश्चिम विभाग) – 11 कोटी 44 लाख 97 हजार 582 रुपये
- मोहित कन्स्ट्रक्शन कंपनी (के पश्चिम विभाग) – 11 कोटी 26 लाख 56 हजार 267 रुपये