मुंबई महानगरपालिकेने गेल्या एकाच महिन्यात थकीत मालमत्ता करवसुली जोरदार करताना 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत 2 हजार 501 कोटी थकीत मालमत्ता कर जमा केला आहे. तर 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 5 हजार 847 कोटी 68 लाख रुपये इतक्या मालमत्तांकराचे संकलन करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात 6200 कोटींचे उद्दिष्ट असताना पालिकेने 68 टक्के मालमत्ता कर वसुली केली आहे.
मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत कर भरणा करता यावा यासाठी महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी शनिवारीदेखील प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आली होती. तसेच यासंबंधित अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या नेतृत्वाखाली करनिर्धारण आणि संकलन खाते कार्यरत आहे.
अशी झाली कार्यवाही
- गेल्या आर्थिक वर्षात (2023-24) मधील मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ही 25 मे 2024 पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे 1 हजार 660 कोटी रुपये रक्कमदेखील यात समाविष्ट आहे.
- याचाच अर्थ विद्यमान आर्थिक वर्षाचे (2024-25) कर संकलन हे 4 हजार 187 कोटी 19 लाख रुपये इतके झाले आहे. विद्यमान आर्थिक वर्षाचे (2024-25) मालमत्ता कर संकलन उद्दिष्ट हे सुमारे 6 हजार 200 कोटी रुपये इतके आहे.
अशी झाली वसुली
- 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या एकाच महिन्यात 2 हजार 501 कोटी 07 लाख रुपयांचा विक्रमी कर वसूल
- 1 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत शहर विभागात 1 हजार 774 कोटी 43 लाख रुपयांचा कर जमा
- 1 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत पूर्व उपनगरे विभागात 1 हजार 091 कोटी 10 लाख रुपयांचे कर संकलन
- 1 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत पश्चिम उपनगरे विभागात 2 हजार 979 कोटी 45 लाख रुपयांचे कर संकलन