अलिकडे संपत्तीच्या वादावरुन अनेक गुन्हे घडत असल्याचे समोर आले आहे. अशातच आंध्र प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या संपत्तीत हक्क न दिल्याने संतापलेल्या बहिणीने दोन भावांची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे.
कृष्णावेनी (28) असे महिलेचे नाव आहे. नेकारिकल्लु गावातील रहिवासी असून ती या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. तिने आपला मोठा भाऊ पोलीस कॉन्स्टेबल गोपी कृष्ण ( 32) आणि लहान भाऊ रामकृष्ण (26) यांना गुंगीचे औषध पाजले होते. त्यानंतर त्या दोघांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. पलनाडु जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक श्रीनिवास राव यांनी सांगितले की, कृष्णावेनी यांना भिती होती की, त्यांचे भाऊ तिच्या वडिलांची संपत्ती हडपतील. त्यामध्ये त्यांची पेन्शन, घर आणि जमिन होती. महिलेने तिच्यावर लावलेले आरोप मान्य केले आहेत. आरोपी महिलेने सांगितले की, तिचे वडील पॉलिराजू शिक्षक होते. ज्यांचा जानेवारीमध्ये अर्धांगवायूने मृत्यू झाला. सरकारकडून 40 लाख रुपये कुटुंबाला मिळाले.
कृष्णावेनीने दावा केला होता की, तिचा त्या संपूर्ण रक्कमेवर अधिकार आहे. तिच्या वडिलांच्या आजारपणात त्यांची सेवा तिनेच केली. संपत्तीवरुन तिन्ही भावंडांमध्ये मतभेद होते. त्यांचे म्हणणे होते की, वडिलोपार्जित संपत्तीत त्यांनाही योग्य हिस्सा मिळायला हवा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णावेनीने 26 नोव्हेंबर रोजी आपल्या लहान भावाची हत्या केली. त्यानंतर 10 डिसेंबरला मोठ्या भावाची हत्या केली. दोन्ही घटनांच्यावेळी तिने ओढणीने आपल्या भावांचा गळा आवळून हत्या केली. हत्येआधी दोघांना तिने दारु पाजली होती. हत्येनंतर तिने आपल्या चुलत भावांच्या मदतीने मृतदेह तलावात फेकले. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पोलीस कॉन्स्टेबल गोपी कृष्ण ड्युटीवर पोहोचला नाही. तो बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरु झाला. तपासात त्यांच्या लक्षात आले की, भावंडामध्ये वडिलांच्या संपत्तीवरुन वाद सुरु होता.