निवडणूक काळातील मिरवणुकांमध्ये जेसीबी, बुलडोझरसारख्या वाहनांचा वापर केला जातो. कार्यकर्ते या वाहनांवर उभे राहतात आणि फुलांचा वर्षाव करतात. यादरम्यान अनुचित घटना घडण्याची भीती असते. त्यामुळे मिरवणुकांतील जेसीबी, बुलडोझरचा वापर रोखण्यात यावा आणि सुरक्षेबाबत गाईडलाईन्स जारी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
पुण्यातील अपर्णा आढाव यांनी अॅड. जतीन आढाव यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात निवडणूक काळातील मिरवणुका तसेच सार्वजनिक कार्यक्रमांत जेसीबीचा अत्यंत धोकादायक पद्धतीने वापर केला जात आहे. अलीकडच्या काळात हा ट्रेंड वाढला आहे. उत्साही कार्यकर्ते हेल्मेट्स, जॅकेट्स, बेल्ट्स या सुरक्षा उपकरणांचा वापर न करता जेसीबीच्या वरच्या भागावर चढतात. ते स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. यात मोठी दुर्घटना घडण्याआधी सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यासाठी न्यायालयाने सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती जनहित याचिकेतून केली आहे.
ना विमा कवच, ना सुरक्षेची खबरदारी
मिरवणुकांत सहभागी होणाऱया व्हीआयपी, नेतेमंडळींवर गुलालाची उधळण आणि फुलांचा वर्षाव करण्यासाठी जेसीबीचा वापर केला जातो. यासाठी जे लोक जेसीबीच्या टोकावर चढतात ते कुठलीही सुरक्षात्मक खबरदारी घेत नाहीत. तसेच अनुचित घटना घडण्याच्या शक्यतेने त्यांचे विमा कवच नसते. अरुंद रस्त्यावरून जाणाऱया मिरवणुकांमध्ये जेसीबीचा वापर करून वाहतुकीला अडथळा आणला जातो, याकडेही याचिकेद्वारे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.