मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला – प्रा. हाके

मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला असून, तुम्ही खरेच शिवाजी महाराजांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहात का एकनाथराव? असा सवाल ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. मुख्यमंत्र्याना आम्ही 12-13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात याची आम्ही आठवण करून देतो. ते कोणत्या धुंदीत आहेत माहीत नाही. त्यांच्याकडे पैशांचे खोके खूप आहेत, असे आम्ही ऐकतो आणि पैशांच्या खोक्याने मी पुन्हा मी मुख्यमंत्री होणार असे त्यांना वाटते. ते फक्त पाहुण्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तुम्ही मुख्यमंत्र्यांची तमाशा कंपनी आहे का?

वडीगोद्रीत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचा चौथा दिवस आहे. यावेळी प्रा. हाके म्हणाले की, एखाद्या जातीला आरक्षण हवे असेल तर सर्व्हे करावा लागतो. जात मागास सिद्ध व्हावी लागते. मग कुठले आरक्षण द्यायचे हे ठरवले जाते. मराठा समाजानेही वारंवार आरक्षण नाकारले आहे. त्यांना कायदा मान्य नाही. मुख्यमंत्री, कोकणातल्या कुणबीचे नातेवाईक तामिळनाडू, गोवा राज्यामध्ये एस्सी, एसटीमध्ये येतात. सध्या सगळे बेकायदेशीर सुरू आहे. आम्ही सांगत असलेले कुणालाही मान्य नाही, असेही हाके म्हणाले. आम्ही भुजबळ यांची नाटक कंपनी असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांची तमाशा कंपनी आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी जरांगे यांच्या वक्तव्यावर केला.

शंभुराजे देसाई हे मुख्यमंत्री, जरांगेमधील दलाल : वाघमारे

सातवी नापास असणारा माणूस राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगतो. गुटखाखाऊ शंभुराजे देसाई मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यामधील दलाल असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी आज केला. शंभुराजे देसाई यांना ओबीसी आंदोलन दिसत नाही का? फक्त मराठा आंदोलनाचे निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जात असल्याचे वाघमारे म्हणाले.

आंदोलक शासकीय रुग्णालयात दाखल

सोनियानगर येथील मंगेश ससाणे त्यांच्यासह पाच जण, अशा सहा जणांचा ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणास बसलेल्या बाळासाहेब दखणेंची तब्येत खालावली आहे. त्यांना उपोषण स्थळावरून जालना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी मंगेश ससाणे म्हणाले की, राज्य सरकारने जानेवारी महिन्यात जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून सगेसोयरे अध्यादेश काढला आहे. याचा फटका ओबीसींबरोबरच दलित आणि भटक्या समाजाला बसणार आहे. दलितांच्या आरक्षणाला बसलेला फटका राजरत्न आंबेडकर यांना चालेल का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.