सिनेमा- महाराज एका लढ्याची कथा

>> प्रा. अनिल कवठेकर

अंधभक्ती ही आता आपल्या देशात आलेली नाही; तर ती या देशाच्या इतिहासात फार आधीपासून नांदत होती. याबद्दल सांगणारा चित्रपट म्हणजे महाराज! धर्म ही अफूची गोळी आहे, असे विचारवंतांनी लिहून ठेवले आहे. तरीही या अफूच्या गोळीशिवाय आम्हाला चैन पडत नाही. धर्माची ही नशा, चारित्र्य शुचिता, पावित्र्य, ईश्वर याहीपेक्षा मोक्षप्राप्ती, स्वर्गप्राप्ती या विषयाभोवती फिरताना दिसते. चरण सेवेच्या नावाखाली होणाऱया व्याभिचाराला सामाजिक, राजकीय आणि धार्मिक मान्यता देणारा समाज व या परंपरेविरुद्ध लढणाऱया करसन दास याच्या क्रांतिकारक लढय़ाची कथा म्हणजे “महाराज!’’

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाचा प्रेक्षकांवर अचूक परिणाम साधण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे कला दिग्दर्शन आणि दुसरे संवाद. या दोन्ही बाबतीत ‘महाराज’ यशस्वी ठरला आहे.

बालपणापासूनच करसन दास मुलजीचा (जुनैद खान) स्वभाव चिकित्सक वृतीचा आहे. समोर दिसणाऱया कोणत्याही गोष्टींचा तो अंधपणे स्वीकार करत नाही तर त्यावर प्रश्न विचारतो. या प्रश्न विचारण्याच्या सवयीतूनच भविष्यातला करसन हा नायक घडलेला आहे. संवादाच्या माध्यमातून आलेले हे प्रश्न खरोखरच अभ्यासपूर्ण आहेत. अग्नीमध्ये आहुती देताना छोटा करसनचा प्रश्न असतो, ‘अग्नि को भगवान का पता मालूम है?’ अग्नि कुंडात अर्पण केलेल्या गोष्टी देवापर्यंत पोहोचणार आहेत का? हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. असे अनेक प्रश्न चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याला परिणामकारक रूप देतात.

1832 या काळात ही कथा घडते. त्या काळातला समाज अस्पृश्यता मानणारा होता. स्पर्श होऊ नये म्हणून बाजूला व्हा सांगणारा आहे आणि एका अस्पृश्य व्यक्तीकडे करसन दास मला थोडी चटणी देशील का असे म्हणतो. त्या अस्पृश्य व्यक्तीला मोठा धक्का बसतो आणि तो त्याची जात सांगतो. तेव्हा सुधारणावादी करसन त्याला म्हणतो, ‘थोडी चटनी क्या मांगी, तूने अपनी जात बता दी!’ करसनने एका अस्पृश्य व्यक्तीकडे चटणी मागणे, यातून त्याच्या विचारांची प्रगल्भता एका वाक्यात स्पष्ट होते. म्हणूनच या चित्रपटाचे संवाद प्रभावी आहेत.

किशोरीला (करसनची भावी वधू) जेव्हा महाराज (जयदीप अहलावत) चरण सेवा करण्यासाठी हवेलीत बोलावतात तेव्हा पहिल्यांदा करसनला ही चरण सेवा म्हणजे महाराज आणि तरुण मुलींमध्ये होणारा शृंगार असल्याचे आणि तो शृंगार महाराजच्या हवेलीला दान देऊन पाहता येत असल्याचे व हा शृंगार पाहिल्यानंतर स्वर्ग प्राप्ती, मोक्ष प्राप्त होत असल्याची लोकांमध्ये असणारी श्रद्धा समजते. करसन याला विरोध करतो. महाराज शांतपणे किशोरीला जायला सांगतात. पण ती जात नाही. कारण तिला मोक्ष प्राप्ती हवी असते.

किशोरीच्या आत्महत्त्येनंतर करसनच्या आयुष्यात विराज येते. विराज ही आधुनिक व प्रगत विचारसरणीची, फटकळ आणि स्पष्टवक्ती तरुणी आहे. विराज त्याला माझ्याशी विवाह करशील का, विचारते. तसेच हो आणि हो असे दोन पर्याय देते. नाही हा पर्याय तिच्याकडे नसतो. शर्वरी वाघने साकारलेल्या विराजचा फुलपाखरासारखा भिरभिरणारा वावर आणि चटपटीत बोलणे एक छाप सोडून जाते.

ज्या सत्यप्रकाश प्रेसमधून निघणाऱया त्याच्या वर्तमान पत्रातून करसन जगापुढे महाराजचे सत्य मांडतो, ती प्रेस महाराजची माणसे जाळून टाकतात. प्रेस जळल्यानंतर काही क्षण करसन हतबल होतो आणि म्हणतो की, ‘मी हे कोणासाठी करतोय? मला तर कोणीच मदत करत नाही.’ तेव्हा विराज म्हणते, ‘हर लडकी विराज बने, किशोरी ना बने ये आपकी जिम्मेदारी है.’

मुंबई प्रांतात गळ्यात काळे मडके बांधून फिरणारा अस्पृश्य समाज आणि 1857 च्या काळात मुंबईतला तरुण उघडपणे प्रेयसीला जवळ ओढून रंग खेळतो हे जरा न पटणारे आहे. महाराजांना पाहून भाविकांनी केलेला जयजयकार, त्यांच्या चेहऱयावरचा भक्तिभाव, भाविकांनी घातलेला साष्टांग दंडवत आणि त्यांच्या हातावर पाय ठेवून स्मित वदनाने पुढे जाणारा महाराज… सगळा श्रद्धेचा बाजार. महाराज यांचा महाल आणि त्याची रचना. महालाच्या अवतीभवती असणारे राजवाडय़ासारखे कक्ष, त्यांचा करडा रंग… श्रद्धेच्या अंधारात न्हाऊन निघालेली वास्तू… अठराव्या शतकातला काळ सगळय़ा दृश्यांतून जिवंत होतो.

होळीच्या जल्लोषात रंग उडवले जातात. पण किशोरीच्या अंगावर कोणीही रंग टाकत नाही. तिचे नृत्य संपल्यानंतर महाराज तिच्या गळ्याला रंग लावतात आणि ते पाहून मावशीला आनंद होतो. कारण महाराजांची सेवा करण्यासाठी इतक्या मुलींमध्ये तिच्या मुलीची निवड झाली आणि मुलगी किशोरीला जिवंतपणी मोक्ष प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे समर्पण म्हणजे पूजेचे पवित्र कार्य असल्याचा तिचा ठाम विश्वास आहे.

या चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण संवाद जे चित्रपटाची उंची वाढवतात. मामा आणि नायकामधला संघर्ष, ‘सोचनेवालों की दुनिया, दुनियावालों की सोच से अलग होती है.’ ज्या विधवा काकूसाठी तो भांडतो तीच त्याला घरातून निघून जायला सांगते. तो घरातून निघतो आणि टाऊन हॉलच्या पायऱयांवर जाऊन झोपतो. ‘मेरेही घर मे मेरे विचारों के लिए जगह नही है. ये करसनदास कौन है. नास्तिक है? श्रद्धा को ठेस पहुंची होगी तभी नास्तिक बना है. सही और गलत का भेद जानने के लिए धर्म की नाही बुद्धी की जरुरत होती है. तुम पढी हो लेकिन पचाया कुछ भी नही. रिवाजो का पालन कर रही थी धर्म का नाही…’ किशोरी व करसनमध्ये टाऊन हॉलच्या पायऱयांवर बोलणे होते. अधिक समजावण्याच्या फंदात न पडता हे नाते तुटल्याचे सांगून तो त्याच्या मार्गाने निघून जातो. किशोरी महाराजांकडे जाते. महाराज तिला समजावतो जे काही होते ते ईश्वराच्या मर्जीने होते. आजपासून तू माझी खास म्हणून माझ्याकडे रहा. गुलामीतच जगण्यात आनंद असल्याचे धर्माने तिच्या मनावर बिंबवले असते. घरच्या स्त्रियांनी महाराजला समर्पित होणे म्हणजे सेवा देणे ही गोष्ट त्या संपूर्ण समाजाने इतकी सहजपणे मान्य केलेली आहे की स्रीच्या अस्तित्वाला, शीलाला कोणतीच किंमत समाजात नाही. एका भावाची बहीण महाराज यदुनाथ उर्फ जेजेमुळे गरोदर राहते. तो भाऊ भडकलेला आहे. पण बहीण एवढे सहन करूनही पाया पडते त्या जेजेच्याच! हाच खरा या चित्रपटाचा विषय आहे. कोणत्याही स्त्राrला हे भानच नाही की जेजेमुळे आपण आपले अस्तित्व गमावून बसलो आहोत. त्याही परिस्थितीत त्या जेजेला देव मानायला तयार आहेत. जेजे जेव्हा कोर्टात जायला निघतो तेव्हा हजारोंचा समुदाय त्याचा जयजयकार करत रस्त्यावर येतो. संपूर्ण रस्त्यावर रांगोळ्या घातल्या जातात. धर्माची नशा किती प्रचंड असू शकते हे जाणवते. संपूर्ण चित्रपटात जुन्या काळाचा फील आहे. काहीतरी घडणार आहे याचा ताण प्रत्येक फ्रेममध्ये आहे. तो ताण वाढवण्याचे संगीत आपले काम चोख करते. क्रांती व्हायला हवी असे आपले मन सांगत असते. तेव्हा हा चित्रपट न राहता एक घटना होते. आपण त्या घटनेचे साक्षीदार बनतो आणि त्या घटनेत सामील होतो. करसनने कोर्ट युद्ध जिंकावे, त्याला न्याय मिळावा, म्हणजे खऱया अर्थाने धर्म लोकांपर्यंत पोहोचेल असे आपल्याला वाटत राहते.
शेवटची 30 मिनिटे ही कोर्टातील दृश्याची आहेत. ऐन वेळेला फुटणारे साक्षीदार त्यामुळे करसनकडे काहीच उरत नाही. ज्या सत्यप्रकाश वर्तमानपत्राने लोकांच्या मनामध्ये सत्याचे बीज पेरलेले असते, कोर्टातील त्याच्या भाषणाने त्या बीजाला अंकुर फुटतात आणि कोणी साक्षीदार नसताना अनपेक्षितपणे एक साक्षीदार येतो जो साक्षीदारांची एक मोठी मालिकाच उभी करतो.

हा चित्रपट म्हणजे एखाद्या युद्धासारखा आहे. चेहऱयावर कायम एक हास्य ठेवून कोणत्याही परिस्थितीत आपण ईश्वरापेक्षा कमी नाही हा भाव ठेवून जगणाऱया अनेक बुवा-महाराजसारखा जयदीप अहलावत याने जेजे उर्फ महाराज उर्फ यदुनाथ अत्यंत समर्थपणे रंगवलेला आहे. हे युद्ध अभिनयामुळेच कोणत्याही तलवारी, बंदुकांपेक्षा अधिक थरारक वाटते. अमीर खानचा मुलगा जुनैद याने आपल्या डेब्यूसाठी अशा एका सामाजिक प्रश्नाच्या चित्रपटाची निवड करावी याकरता त्याचे अभिनंदन करायलाच हवे. सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपटाला एक गंभीर टोन कायम दिलेला आहे. ‘द महाराज लायबेल केस, 1862’ या सत्यघटनेवर आधारित असलेला समाजाचे भ्रमित रूप पाहून मन उद्विग्न करायला लावणारा हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)