दादर पुलाखालील एसटी पार्किंगचा प्रश्न सुटणार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

दादर पूर्वेकडील उड्डाणपुलाखाली एसटी बसेस पार्किंग करण्यावरून मुंबई महापालिका आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्यात सहा वर्षे सुरू असलेला वाद अखेर मिटणार आहे. उड्डाणपुलाखालील एसटी महामंडळाचे ‘पे अॅण्ड पार्किंग’ बंद करण्याचा पालिकेचा आदेश न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच परिवहन महामंडळ व पालिकेला सामंजस्याने तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत.

पालिकेच्या उपमुख्य अभियंत्यांनी (वाहतूक) दादर पूर्वेकडील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाखाली एसटी बसेससाठी ‘पे अॅण्ड पार्क’ बंद करण्याचा आदेश जानेवारी 2018 मध्ये जारी केला. त्या आदेशाला आव्हान देत एसटी महामंडळाने उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. एसटी महामंडळ दीर्घकाळापासून ज्या जागेचा बस पार्क करण्यासाठी वापर करीत आहे, ती जागा पार्किंगसाठी बंद करताना पालिकेने सर्व बाबी विचारात घेतल्या नाहीत. 2017 च्या न्यायालयीन आदेशाचा चुकीचा अर्थ काढला, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने एसटीसाठी ‘पे अॅण्ड पार्क’ बंद करण्याचा पालिकेचा आदेश रद्द केला आणि परिवहन महामंडळाला मोठा दिलासा दिला.

न्यायालयाचे निरीक्षण

  • दादरच्या उड्डाणपुलाखाली एसटी बसेससाठी ‘पे अॅण्ड पार्क’ बंद करण्याचा आदेश जारी करण्यापूर्वी पालिकेने राज्य परिवहन महामंडळाशी सल्लामसलत केली नाही.
  • एसटी महामंडळासाठी कठोर आदेश काढण्यापूर्वी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करीत महामंडळाची बाजू ऐकून घेतली नाही.
  • या प्रकरणात व्यापक जनहित आहे. त्यामुळे परिवहन महामंडळ आणि मुंबई महापालिका यांनी सामोपचाराने तोडगा काढून पार्किंगचा प्रश्न सोडवावा.

एसटी महामंडळाचा कोर्टातील युक्तिवाद

उड्डाणपुलाखालील पार्किंगवर आक्षेप घेणारी जनहित याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेवर उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिलेल्या आदेशाचा पालिकेने चुकीचा अर्थ काढला आणि महामंडळाला दुसरीकडे बस स्टॅण्ड हलवण्याचे निर्देश दिले. वास्तविक दादर उड्डाणपुलाखालची जागा पार्किंगसाठी वापरली जात नव्हती, तर प्रवासी केवळ या ठिकाणी बसमध्ये चढउतार करायचे, असा युक्तिवाद महामंडळाच्या वकिलांनी केला.