परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांची सरकारने हत्याच केली असून याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करून सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारने 25 लाखांची मदत द्यावी, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना आणि एका तरुणाचा कारागृहात मृत्यू होण्यामागचे कारण काय असेल? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सूर्यवंशीचे शवविच्छेदन न्यायाधीशांच्या उपस्थितीत करावे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन नि:पक्षपातीपणे काम करेल, अशी आमची आशा आहे. कारागृहात मृत्यू झाल्यामुळे जनतेत संताप व्यक्त होणे स्वाभाविक आहे पण परभणीच्या जनतेने शांतता राखावी, अशी विनंती खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
परभणीची परिस्थीती हाताळण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. परभणीत आंबेडकरी अनुयायांवर पोलीसांनी अमानुष अत्याचार केले आहेत. परभणी पेटली असताना सरकारला मात्र त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. मुख्यमंत्री नागपुरात मिरवणुका काढून स्वतःचा जयघोष करून घेत आहेत तर तीन्ही पक्षाचे आमदार मात्र मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यात व्यस्त आहेत. भाजपा सरकारने परभणी प्रकरणात लक्ष घालावे व सुर्यवंशी यांना न्याय द्यावा, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.