जिल्हाधिकाऱ्यांकडून छळवणूक प्रकरण, पूजा खेडकरांची तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांनी वाशीम पोलिसांत  तक्रार दाखल केली आहे. हा तक्रार अर्ज पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दिवसे यांनी छळवणूक केल्याचे खेडकर यांनी म्हटले असून त्याची चौकशी आता पुणे पोलीस करणार आहेत.

सोमवारी (दि. 15) पूजा खेडकर यांची वाशीम पोलिसांनी तब्बल तीन चौकशी केली. पोलीस त्यांच्या चौकशीसाठी आले असल्याची चर्चा होती. मात्र नंतर खेडकर यांनी आपणच घरी महिला पोलिसांना बोलावल्याचे सांगितले. यानंतर खेडकर यांनी पोलिसांना का बोलावले, याच्या चर्चा झडू लागल्या होत्या. त्यातच आता खेडकर यांनी नोंदविलेल्या जबाबात जिल्हाधिकारी दिवसे यांनी आपली छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशीम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे. ही तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणी चौकशी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

खासगी आलिशान गाडीला लाल दिवा लावून फिरणे, बैठकीसाठी स्वतंत्र दालन, दिमतीला शिपाई असे अनेक प्रकार पुढे आल्यानंतर खेडकर या चर्चेत आल्या. त्यांच्या या संपूर्ण प्रकरणाचा  पुणे जिल्हाधिकारी  दिवसे यांनी शासनाला अहवाल पाठविला होता. पुण्यातील वादानंतर खेडकर यांची वाशीम येथे बदली करण्यात आली. याप्रकरणी खेडकर यांची चौकशी सुरू आहे. त्यातच आता खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरोधात छळवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची चौकशी वरिष्ठ अधिकाऱयांमार्फत सुरू केली आहे. या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.