प्रो-कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामातील हैदराबाद आणि नोएडा येथील दोन टप्पे संपले असून, आता तिसऱ्या टप्प्याचा पंगा मंगळवारपासून (दि. 3) पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार आहे. गुणतक्त्यातील अव्वल सहा संघ बाद फेरी गाठणार असल्याने तिसऱ्या टप्प्यातील सामने अत्यंत चुरशीचे होणार एवढे नक्की. त्यानंतर स्पर्धेचा अंतिम थरारही पुण्यातच रंगणार आहे. त्यामुळे गतविजेत्या पुणेरी पलटणचे शिलेदार घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतात याची उत्कंठा आता टिपेला पोहोचली आहे.
प्रो-कबड्डी लीगमधील संघांचे आता पुण्यात आगमन झाले आहे. पुणेरी पलटण संघाचे प्रशिक्षक बी. सी. रमेश, कर्णधार आकाश शिंदे, यू मुम्बा संघाचे प्रशिक्षक घोलमरेझा मजंदरानी, युवा खेळाडू अजित चव्हाण व हरयाणा स्टीलर्सचा नव्या दमाचा खेळाडू शिवम पठारे यांनी येथे जिंकण्यासाठी आलोय, असा इशारा सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिस्पर्धी संघांना दिलाय. पुण्यातील तिसरा टप्पा 24 डिसेंबरला संपणार असून, येथेच 26 ते 28 डिसेंबरदरम्यान बाद फेरीचा थरार रंगणार आहे. 26 आणि 27 डिसेंबरला उपांत्य लढती होणार असून, त्यापूर्वी एलिमिनिटर लढती होतील. 29 डिसेंबरला प्रो-कबड्डी लीगच्या विजेतेपदाचा फैसलाही पुण्यातच होणार आहे.
गतविजेत्या पुणेरी पलटणला यंदाही जेतेपद राखण्याची संधी असेल. गुणतक्त्यात आम्ही सध्या पाचव्या स्थानी असलो तरी पुण्यातील तिसऱ्या टप्प्यात घरच्या मैदानावर चाहत्यांचा बुस्टर डोस खेळाडूंमध्ये अधिक उत्साह निर्माण करणार आहे.