कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लॅमर मिळवून देणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमाचा धमाका येत्या 18 ऑक्टोबरपासून होणार आहे. तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यातील लढतीने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
यंदाच्या मोसमात प्रो कबड्डी लीग पुन्हा एकदा तीन शहरांमध्ये खेळविली जाणार असून 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2024 दरम्यान हैदराबाद येथील गच्ची बावली इनडोअर स्टेडियममध्ये पहिले सत्र पार पडेल तर स्पर्धेचे दुसरे सत्र 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 दरम्यान नोएडा इनडोअर स्टेडियम येथे होणार आहे. स्पर्धेचे तिसरे सत्र पुण्यातील बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम येथे 3 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान खेळविले जाणार असल्याचे माहिती ‘मशाल स्पोर्ट्स’ने दिली.
या प्रो कबड्डी लीगचा प्रत्येक मोसम कोट्यवधी कबड्डीप्रेमींना समोर ठेवून आखला जातो. यावेळी त्याच दृष्टीने स्पर्धेची आखणी ‘मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख व प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी केली. प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव मुंबई येथे 15 व 16 ऑगस्ट 2024 रोजी पार पडला. आठ खेळाडूंनी एक कोटीची मर्यादा ओलांडल्यामुळे हा लिलाव ऐतिहासिक ठरला.