प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या पर्वातील प्ले ऑफ आणि अंतिम लढतीचा थरार पुण्यातील म्हाळुंगे बालेवीडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे रंगणार आहे. हे सामने 26 ते 29 डिंसेबर दरम्यान खेळवण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
लीग टप्प्यातील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघ 26 डिसेंबर रोजी एलिमिनेटर सामन्यांमध्ये एकमेकांना भिढतील. संघांच्या लढती पुढील प्रमाणे होणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर येणारा संघ एलिमिनेटर 1 मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. चौथ्या स्थानावरील संघ पाचव्या स्थानावरील संघाशी एलिमिनेटर 2 मध्ये खेळेल. एलिमिनेटर 1चा विजेता उपांत्य फेरीत गुणतालिकेतील अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाशी खेळेल. एलिमिनेटर 2 चा विजेता दुसऱ्या उपांत्य फेरीत गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानावरील संघाशी खेळेल. या दोन्ही उपांत्य लढती 27 डिसेंबर रोजी खेळल्या जातील. त्यानंतर 11व्या पर्वाची अंतिम लढत २९ डिसेंबर रोजी होईल. लीगचा दुसरा टप्पा सध्या नोएडा येथे सुरू आहे. हा टप्पा 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान अखेरचा टप्पा पुण्यातच खेळवला जाणार आहे. त्यानंतर प्ले ऑफ लढतींना सुरुवात होईल.