हरियाणाने मैदान मारलं, पाटणा पायरेट्सला चितपट करून पहिल्यांदाच ‘प्रो कबड्डी लीग’चं विजेतेपद पटकावलं

फोटो : चंद्रकांत पालकर

प्रो कबड्डीच्या अकराव्या पर्वात हरियाणा स्टिलर्सने विजेतेपदाला गवसणी घातली. बचावपटू महंमद रेझा शाडलुईचा भक्कम बचावापुढे पाटणा पायरेटसचे आव्हान 32-23 असे हज परतवून लावले. हरियाणाने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीगचं विजेतेपद पटकावलं आहे.

संपूर्ण सामन्यात हरियाणा स्टिलर्सच्या बचावफळीने पाटणा पायरेट्सच्या चढाईपटूंची कसोटी पाहिली. देवांक आणि अयान या चढाईपटूंवर पाटणा अवलंबून होते. पण, आज त्यांचे दोन्ही शिलेदार हरियानाचा बचाव भेदू शकले नाहीत आणि बचावफळी शिवम, विनयला रोखू शकले नाहीत. सामना एकवेळ एकदोन गुणांच्या फरकाने सुरु होता. मात्र, सामना संपण्यास सात मिनिटे असताना हरियाना स्टिलर्स संघाने चढवलेला लोण सामन्याचा निकाल ठरविण्यास पुरा ठरला. या लोणनंतर हरियाणा संघाने पूर्ण वर्चस्व राखत विजेतेपद निसटणार नाही, याची काळजी घेतली. शाडलुईने बचावात मिळविलेले 7 गुण लीगच्या इतिहासात अंतिम फेरीतील सर्वाधिक ठरले. चढाईत शिवमने 9 आणि विनयने 7 गुण मिळवून आपली जबाबदारी चोख बजावली. तुलनेत पाटणाकडून गुरदीपच्या हायफाईव्ह खेरीज सांगण्यासारखे काहीच घडले नाही. सर्वाधिक चढाईचे गुण मिळविणाऱ्या देवांकने एका हंगामातील गुणांचे त्रिशतक गाठले. मात्र, त्याला पाच गुणांच्या पुढे जाता आले नाही. अयानही केवळ 3 गुण मिळवू शकला. येथेच पाटणाचे अपयश स्पष्ट होते.

सामन्याचा पूर्वार्ध हरियाना स्टिलर्सच्या नावावर राहिला. पहिल्या चढाईपासून त्यांनी आपल्या बचावाचा दरारा निर्माण केला होता. महंमद रेझा शाडलुईने यात महत्वाची भूमिका बजावली. त्याला पुढे पहिल्या सत्रात जयदीप आणि संजयची सुरेख साथ मिळत होती. पाटणा संघ मात्र आपल्या चढाईपटूंवर अवलंबून असल्याने त्यांना सामन्यात लय शोधण्यास संधी मिळत नव्हती. शिवम पठारेने आपल्या चढाया अचूक करताना पाटणाच्या बचावफळीला चांगले आव्हान दिले. शुभम शिंदे आणि अंकित यांच्यावर त्यांच्या बचावाची मदार होती. पण, शुभमला आज आपला लौकिक दाखवता आला नाही. अंकितचाही तेवढा प्रभाव पडत नव्हता. मात्र, गुरुदीरपने आज जबाबदारी घेताना संघाचे आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. देवांक आणि अयान या दोन्ही चढाईपटूंना हरियानाच्या बचावपटूंनी स्थिरावू न दिल्यामुळे मध्यंतराला हरियाना संघाचा 15-12 आघाडी राखता आली.

उत्तरार्धात दोन्ही संघांनी आपली ताकद लक्षात घेत खेळाचा वेग कमी केला होता. कधी चढाई, तर कधी बचावाच्या आघाडीवर गुण मिळविण्याचा दोन्ही संघ प्रयत्नात दिसून आले. त्यामुळे उत्तरार्धाच्या पहिल्या दहा मिनिटांच्या खेळात केवळ आठ गुणांचीच नोंद झाली. त्यामुळे गुणफलक हरियानाच्या बाजूने १९-१६ असा राहिला होता. सहाजिकच अखेरच्या दहा मिनिटांतील तीव्रता वाढली होती. मात्र, हरियाना स्टिलर्सने अचानक सामन्याला वेग देत तीन मिनिटांत पाटणा संघावर लोण देत आघाडी २७-१७ असी भक्कम केली. यामध्ये बचावाची कमाल होतीच. पण, विनयने एका चढाईत आणलेले दोन गुण तेवढेच महत्वाचे ठरले. लोण चढवल्यावर हरियाना स्टिलर्सचे खेळाडू अधिक आक्रमक झाले आणि त्याचा सामना करण्यात पाटणा संघाला तेवढे यश आले नाही. हरियानाने ही संधी साधून त्यांच्यावरील दडपण वाढवले. लोणनंतर पाटणा संघाला केवळ पाच गुणांची कमाई करता आली. तुलनेत हरियानाने देखिल पाच गुण मिळवून निर्विवाद वर्चस्वासह विजेतेपदाचे स्वप्न साकार केले.

स्पर्धेतील विजेत्या हरियाना स्टिलर्स संघाला करंडक व 3 कोटी रुपये तर, उपविजेत्या पाटणा पायरेट्स संघाला करंडक व 1.8 कोटी रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रो कबड्डी लीग कमिशनर अनुपम गोस्वामी, आयकेएफचे अध्यक्ष विनोद तिवारी आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नवदिप सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.