मोदी-ट्रम्प चांगले मित्र तरीही हिंदुस्थानींची अशी अवस्था; प्रियंका गांधी यांचा निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासूनच मोठ-मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. अशातच बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात संसदेतही पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी संसद भवनाबाहेर निदर्शने केली.

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करण्याविरोधात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे अमेरिकन समकक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. “पंतप्रधान मोदी ट्रम्प यांचे इतके चांगले मित्र आहेत तर मग त्यांनी हे का होऊ दिले? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला.

‘अमेरिकेतून हद्दपार केलेल्या बेकायदा हिंदुस्थांनींना हातात बेड्या आणि पायात साखळदंड घालून रवाना करण्यात आले. आपण आपले जहाज या हिंदुस्थानी नागरिकांना घेण्यासाठी का पाठवू शकलो नाही? हातकड्या आणि बेड्या घालून पाठवणे ही लोकांसोबत वागण्याची कोणती पद्धत आहे. अशा अमानवी परिस्थितीवर परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली.