भाजपा तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही. परंतु, आता परीक्षा अर्जांवर तब्बल 18 टक्के जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर आकारून बेरोजगारांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. अशा शब्दांत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पालकांनी पोटाला चिमटा घेऊन पै-पै जोडून मुलांना शिकवले. परंतु, भाजपा सरकारने त्यांच्या स्वप्नांच्या माध्यमातूनही पैसा कमावण्याचेच काम केले, असा सणसणीत आरोपही त्यांनी केला आहे.
अग्निवीरसह प्रत्येक सरकारी नोकऱ्यांच्या अर्जांवर सरकार जीएसटी वसूल करत आहे. अर्ज भरल्यानंतर सरकारच्या हलगर्जीपणामुळे पेपरफुटी झाली. प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्यामुळे तरुणांचे पैसेही बुडाले, याकडेही प्रियांका गांधी यांनी लक्ष वेधले आहे. प्रियांका गांधींनी एक्सवरून एक पोस्ट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या पोस्टसोबत लखनौच्या सुल्तानपूर रोड येथील कल्याण सिंग सुपर स्पेशालिटी कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा परीक्षा अर्जही जोडला आहे.