Modi Adani Bhai Bhai – प्रियांका गांधी काळी बॅग घेऊन संसदेत दाखल, राहुल गांधी म्हणाले, ‘क्यूट आहे’!

अदानी समूहांवरील आरोपांची चौकशी करण्याच्या मागणीवरून ‘इंडिया’ आघाडी संसदेत आणि संसदेबाहेरही आक्रमक झाली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ‘इंडिया’ आघाडीचे खासदार या मागणीवर ठाम असून संसदेबाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलनही करत आहेत. मात्र सरकार यापासून पळ काढत असल्याचे दिसते. मंगळवारीही ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी मोदी-अदानी भाई-भाई अशा जोरदार घोषणा देत संसद परिसरामध्ये आंदोलन केले.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीचे खासदार काळी बॅग घेऊन संसद परिसरात दाखल झाले. या बॅगवर एका बाजुला मोदी आणि अदानी यांचा फोटो तर दुसऱ्या बाजुला मोदी-अदानी भाई-भाई अशी घोषणा लिहिलेली होती.

प्रियांका गांधी काळी बॅग खांद्यावर लटकवून संसदेत आल्या तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बॅगची डिझाइनही बघितली आणि ‘क्यूट आहे’ असे म्हटले. ही बॅग कुणी बनवली असेही त्यांनी विचारल्यावर प्रियांका गांधी खळखळून हसल्या.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, आम्ही संसदेच्या बाहेर आंदोलन करत आहोत. आम्ही संसदेत यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे, मात्र भाजपला यावर चर्चा करायची नाही. त्यामुळे काही ना काही कारण देऊन संसदेचे कामकाज स्थगित केले जात आहे.