प्रियांका गांधी पॅलेस्टाईन पाठिंब्याची बॅग घेऊन संसदेत, पिशवीवर पांढरे कबुतर आणि टरबुजाचे चित्र

पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवणारी बॅग घेऊन काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी आज संसदेत पोहोचल्या. गाझापट्टीत इस्रायलकडून पॅलेस्टिनींवर सातत्याने होत असलेल्या हवाई हल्ल्याचा प्रियांका गांधी यांनी आपल्या कृतीतून निषेध व्यक्त केला. पिशवीवर लिहिलेले होते, पॅलेस्टाईन मुक्त होईल. शांततेचे प्रतीक पांढरे कबुतर आणि पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक टरबूज यांचे चित्रही पिशवीवर रेखाटण्यात आल्याचे दिसले.

प्रियांका गांधी यांच्या कृतीवर भाजपच्या खासदारांनी टीका केली. त्यावर मी कोणती बॅग घ्यावी, काय परिधान करावे याबाबत मला पुराणमतवाद्याने सांगू नये. असे प्रियांका यांनी सुनावले.

बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात संसद परिसरात निदर्शने

बांगलादेशात हिंदूंवर आणि मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसह विरोधी पक्षातील खासदारांनी मोदी सरकारविरोधात संसद परिसरात निदर्शने केली. तसेच तेथील हिंदूंना सुरक्षा पुरविण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी लावून धरली. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी मोदी सरकारने ठोस पावले उचलावीत. तेथील हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश सरकारसोबत चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.