शिक्षणाचे खासगीकरण चुकीचे; मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत नाही, राहुल गांधी यांचे स्पष्ट मत

शिक्षणाचे खासगीकरण चुकीचे असून सध्याच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत नाही. मी सध्याच्या शिक्षण प्रणालीशी सहमत नाही, असे स्पष्ट मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. विविध राज्यांच्या सरकारांना शिक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त तरतूद करायला हवी. खासगीकरण आणि केवळ आर्थिक मदत करून उत्तम दर्जाचे शिक्षण देता येणार नाही, असे ते म्हणाले. आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. याबाबतचा व्हीडियो त्यांनी एक्सवरून शेअर केला आहे.

काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील कामात काय फरक आहे असा सवाल एका विद्यार्थ्याने केला. यावर साधनसंपत्तीचे निष्पक्ष पद्धतीने सर्वांना समान वाटप झाले पाहिजे यावर काँग्रेस आणि युपीएचा विश्वास आहे. समाजातील कुठलाच वर्ग त्यापासून मागे रहायला नको असे आम्हाला वाटते, असे राहुल गांधी म्हणाले. तर दुसरीकडे भाजपा विकासाच्या मुद्यावर अधिक आक्रमक असते. साधनसंपत्तीवर फोकस करण्यावर त्यांचा विश्वास आहे. परंतु, हे चुकीचे आहे. समाजात जितके सौहार्दाचे वातावरण असेल तितकेच लोक आपापसात कमी लढतील, त्यांच्यात कमी वाद होतील असे राहुल गांधी म्हणाले.

आपले शैक्षणिक धोरण केवळ 5 गोष्टींसाठीच

भारत जोडो यात्रेदरम्यान मी हजारो विद्यार्थ्यांशी बोललो. त्यांना विचारले तुम्हाला आयुष्यात पुढे काय बनायचे आहे. त्यावर वकील, डॉक्टर, इंजिनीयर, आर्मी असे उत्तर त्यांनी दिले. परंतु, असे होऊ शकत नाही, देशात केवळ पाचच गोष्टी असू शकत नाहीत. परंतु, आपले शैक्षणिक धोरण या पाच गोष्टींसाठीच बनले आहे. 90 टक्के मुले या प्रोफेशनमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते नैराश्यात जातात. त्यामुळे मुलांना तेच करण्याची संधी मिळायला हवी जे त्यांना करायचे आहे. आपले शैक्षणिक धोरण अनेक क्षेत्रांना कमी लेखते, असे राहुल गांधी म्हणाले.