
माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची खासगी कागदपत्रे नॅशनल अर्काईव्हज ऑफ इंडियाच्या (एनएआय) ताब्यात गेली आहेत. सोमवारी डॉ. कलाम यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कागदपत्रे हस्तांतरित समारंभ झाला. या संग्रहात डॉ. अब्दुल कलाम यांचे मूळ पत्रव्यवहार, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, टूर रिपोर्ट आदी खासगी कागदपत्रांचा समावेश आहे. याशिवाय विविध विद्यापीठ आणि संस्थांमध्ये डॉ. कलाम यांनी दिलेली व्याख्याने आणि अनेक मूळ छायाचित्रे यांचा समावेश आहे. हा संग्रह डॉ. कलाम यांची भाची डॉ. एपीजेएम नझीमा मराईकायर आणि पणतू एपीजेएमजे शेख सलीम यांनी एनएआयला दान केला. त्यांनी एनएआयचे महासंचालक अरुण सिघल यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी केली.