वाल्मीक कराडच्या मुलाचेही कारनामे; रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ट्रक, कार, प्लॉट बळकावला

संतेष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक असलेला ‘आका’ वाल्मीक कराड कोठडीत असताना त्याचा मुलगा सुशील कराडही अडचणीत आला आहे. सुशील कराडने त्याच्या ट्रेडर्समधील जुन्या मॅनेजरला मारहाण करून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोन ट्रक, दोन कार आणि प्लॉट बळकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बीड आणि सोलापूर पोलिसांनी सुशील कराडविरुद्ध साधी फिर्यादही दाखल करून घेतली नाही. त्यामुळे मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन खासगी फिर्याद दाखल केली आहे.

आता त्याचा मुलगा सुशील कराडचा कारनामा उघड झाला आहे. तक्रारदार महिला, तिचे पती आणि त्यांची दोन मुले परळी येथे राहण्यास होती. महिलेचा पती सुशील कराडच्या ट्रेडर्समध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. त्यांच्याकडे दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी व प्लॉट होता. मात्र, सुशील कराडने एवढे कसे काय तुम्ही कमावले? असे म्हणत महिलेच्या पतीला मारहाण करीत रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी आणि प्लॉट बळकावला. कोणतेही पैसे दिले नाहीत. अनिल मुंडेच्या नावावर ही सर्व खरेदी केली. अडीच तोळे सोनेही बालाजी टाक ज्वेलर्सला विकायला लावले आणि सुशील कराडने पैसे घेतले, असे न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बीड, सोलापूर पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही

सुशील कराड विरोधात मॅजेनरच्या पत्नीने सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती; पण येथे फिर्याद दाखल करून घेतलीच नाही. सोलापूर पोलीस आयुक्त, बीड पोलीस अधिक्षक यांच्याकडेही रजिस्टर पोस्टाने तक्रार दाखल केली, पण सुशील कराडविरुद्ध कारवाई झाली नाही.

सोमवारी सुनावणी

महिलेने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद वजा तक्रार दाखल केली आहे. सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती या फिर्यादीमध्ये करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेच्या वतीने अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. पवार, अॅड. व्हन माने हे काम पहात आहेत. यासंदर्भात सोमवारी (दि. 13) सुशील कराडवर केलेल्या आरोपांबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ड्रग्जच्या तस्करीतील आरोपींसोबत मुंडेंचे फोटो

अलीकडेच पाकिस्तानातून आलेले 173 किलो ड्रग्ज सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 890 कोटींचे आहे. या प्रकरणातील आरोपी कैलास सानप, दत्ता आढळे यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे फोटोच धस यांनी आज झळकावले.