मोदी यांची खुर्ची डळमळीत, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्ला

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची आता डळमळीत झाली असून विधानसभेला महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील मोदी सरकार निश्चितच कोसळेल, असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

केंद्रातील मोदींचे सरकार हे नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीच्या पाठिंब्यावर उभं आहे. हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू भाजपला सोडून जातील. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार 13 महिन्यांत कोसळले होते त्याचप्रमाणे मोदींचे सरकारही कोसळेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. चव्हाण यांचे आतापर्यंतचे अंदाज खरे ठरलेत. त्यामुळे त्यांच्या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

महायुतीला 100 जागाही मिळणार नाहीत

लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. विधानसभेला त्याहून चांगले यश मिळेल. महायुतीत कोण राहील किंवा कोण जाईल हे आपल्याला माहिती नाही. पण त्यांना 100ही जागा मिळणार नाहीत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.