दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या नव्हे तर 11व्या स्थानावर, पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले वास्तव

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य सहाव्या क्रमांकावर असल्याचे दाखवले होते, पण प्रत्यक्षात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात अकराव्या क्रमांकावर असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक पाहणी अहवालाचा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात दिले. ते म्हणाले की, आर्थिक पाहणी अहवालात चुकीची माहिती दिली आहे. महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात सहावा क्रमांक आहे असे सांगितले. महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेला, पण वस्तुस्थितीनुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा सहावा नव्हे तर अकरावा क्रमांक आहे. हातातील कागदपत्रे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दाखवत पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेसनोटमधली आहे. प्रत्येक राज्याचे दरडोई उत्पन्न त्यामध्ये दिलेले आहे. त्या यादीनुसार महाराष्ट्राचा क्रमांक अकरावा आहे. दरडोई उत्पन्नात अनेक राज्ये आपल्या पुढे आहेत. केरळ, पुद्दुचेरी, उत्तराखंड, तामीळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, दिल्ली, सिक्कीम ही सर्व राज्ये आपल्या पुढे आहेत. दिल्ली, सिक्कीम तर छोटी राज्ये आहेत, तीही आपल्या पुढे आहेत. महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर का गेला? हे आपल्याला भूषणावह नाही, पण आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्र पुढे नेऊ या असे आवाहन चव्हाण यांनी केले.