मुंबईचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. IPL 2025 च्या लिलाव प्रक्रियेमध्ये त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. तसेच सय्यद मुश्ताक अली करंडकामध्येही त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. तसेच आता विजय हजारे करंडकासाठी मुंबईच्या संघातून त्याचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे पृथ्वीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकामध्ये मुंबईच्या संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते. पृथ्वी शॉ चा संघामध्ये समावेश होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये 197 धावा केल्या होत्या. पंरतु एकही अर्धशतक त्याला ठोकता आले नाही. तसेच IPL 2025 साठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये सुद्धा त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. आता 17 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडकासाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली. परंतु पृथ्वी शॉ चा संघामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की,”देवा आता तुच सांग मला अजून काय पहावं लागणार आहे? जर 65 डावांमध्ये 55.7 च्या सरासरीने 3399 धावा आणि 126 स्ट्राईक रेट पुरेसा नसेल तर मी काय करू? मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आशा आहे की लोकांचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे, मी नक्कीच पुनरागमन करेन. ओम साई राम,” असे पृथ्वीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटले आहे.
विजय हजारे करंडकासाठी संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त संघामध्ये सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर, आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, रोशन ठाकूर, जुनेद खान, हर्ष तन्ना आणि विनायक भोईर या खेळाडूंचा समावेश आहे.