
कारागृहात असलेल्या बंदिजनांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची होणारी फरफट, प्रवासाचा खर्च, कागदपत्रांचा पाठपुरावा करताना अनेकांची दमछाक होत होती. मात्र, कारागृह प्रशासनाने सुरू केलेल्या ई-मुलाखत सुविधेमुळे बंदिवानांसह त्यांच्या नातेवाईकांमधील सुसंवाद वाढला आहे. या सुविधेचा वर्षभरात राज्यातील विविध कारागृहांतील 3 लाख 16 हजारांवर जास्त बंद्यांनी लाभ घेतला आहे, तर गंभीर गुन्ह्यातील 1100 परदेशी बंद्यांनीही नातेवाईकांशी संवाद साधला आहे. कारागृह प्रशासनाच्या उपक्रमाचे बंदिवानांसह कुटुंबीयांनी कौतुक केले आहे.
राज्यातील विविध कारागृहांत कच्च्या बंदिवानांची (न्यायाधीन बंदी) संख्या जास्त आहे. कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
” राज्यातील बहुतांश कारागृहांतर्गत असलेल्या बंदिवानांचा कुटुंबीयांसमवेत संवाद व्हावा, यादृष्टीने ई-मुलाखत उपक्रम राबविला जात आहे. जानेवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2025 कालावधीत विविध कारागृहांत 3 लाख 16 हजार 747 बंद्यांनी कुटुंबीयांसोबत सुसंवाद साधून सुविधेचा लाभ घेतला आहे.
डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह विभाग
नातेवाईकांना ताटकळत थांबावे लागणार नाही
■ कारागृहात प्रत्यक्ष मुलखत घेण्यापूर्वी नातेवाईकांना यापूर्वी तासन्तास वाट पाहावी लागत होती. आता बंद्यांसोबत बोलण्यासाठी नातेवाईक काही दिवस आधी ई-प्रिझन संगणकीय प्रणालीद्वारे नावनोंदणी करू शकतात. त्यामुळे वेळेतच मुलाखतीची प्रक्रिया पार पडते. राज्यातील सर्व कारागृहांच्या प्रवेशद्वारांसमोर सुविधेची माहिती देणारे फलक, ई-मुलाखत नोंदणीची माहिती दिली आहे.