पंतप्रधानांचा नोकर 284 कोटी घेऊन फरार

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा नोकर जहांगीर आलम याच्याकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती आढळली आहे. आलमकडे एक खासगी हेलिकॉप्टरसुद्धा आहे. जहांगीर हा शेख हसीना यांच्या घरात पाहुण्यांना पाणी देण्याचे काम करत होता. जहांगीरने हसीना यांच्या कार्यालयात आणि घरात काम करत असल्याचे सांगून अनेक लोकांकडून लाच घेतली होती. काम करून देण्याच्या बहाण्याने तो लोकांकडून पैसे उकळायचा. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान हसीना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. परंतु हे प्रकरण समोर येण्याआधीच जहांगीर परदेशात पळून गेला आहे. बांगलादेशमध्ये माजी लष्करप्रमुख, पोलीस अधिकारी, कर अधिकारी आणि अनेक सरकारी कर्मचाऱयांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. पंतप्रधानांच्या नोकराचेही नाव या यादीत आहे. जानेवारीमध्ये पंतप्रधान हसीना चौथ्यांदा सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बांगलादेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने नुकतीच देशाच्या माजी राष्ट्रीय पोलीस प्रमुख बेनझीर अहमद यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे. एकेकाळी हसीनांच्या जवळच्या असलेल्या बेनझीर यांच्यावर करोडोंची संपत्ती असल्याचा आरोप आहे, जी त्यांनी भ्रष्टाचारातून जमा केली.