ऑलिम्पिकच्या झगमगाटात स्वत:ला हरवू नका; सहभागी खेळाडूंना पंतप्रधानांकडून शुभेच्छा

‘मिशन गोल्ड’साठी पॅरिसला जाणाऱ्या हिंदुस्थानच्या खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. ऑलिम्पिकच्या झगमगाटात स्वतःला हरवू नका. आपल्या ध्येयावरच लक्ष पेंद्रित करा, असा वडीलकीचा सल्लाही पंतप्रधानांनी दिला.

ऑलिम्पिकसाठी पॅरिसला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात खेळाडूंशी वैयक्तिक आणि ऑनलाईन संवाद साधला. या संवादात ते म्हणाले, मी नेहमीच क्रीडा जगताशी जोडलेल्या खेळाडूंच्या भेटीगाठी घेतो. नवनव्या गोष्टी जाणण्याचा प्रयत्न करतो. सरकारच्या नात्याने काय बदल करायला हवा, यासाठी काम करतो. सर्वांशी थेट संवाद साधणे हेच प्रामाणिक प्रयत्न असतात. आता तुम्ही ऑलिम्पिकला जात आहात. तिथल्या झगमगाटात स्वतःला हरवू नका. कारण तिथे सर्वांचे फोकस हलते. तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना पाहून विचलित होऊ शकता, पण हा उंची-ताकदीचा खेळ नाही. हा कौशल्याचा खेळ आहे. तुम्ही प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीमुळे जराही विचलित न होता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. यश तुमच्या दृष्टिपथात असेल.

 नवा इतिहास रचणार

मला पूर्ण विश्वास आहे. आजवर ऑलिम्पिकमध्ये आपण जे काही विक्रम रचले आहेत ते यावेळी मोडले जातील. ऑलिम्पिकसाठी पॅरिसला जाणारे हिंदुस्थानी खेळाडू देशाची मान उंचावेल असा पराक्रम रचतील. आतापर्यंत तुम्ही प्रचंड मेहनत करून इथवर पोहोचला आहात. आता देशासाठी खेळाच्या मैदानात स्वतःला झोकून काही करून दाखवण्याची वेळ आली आहे. खेळाच्या मैदानात आपली सर्वोत्तम कामगिरी करणारा देशासाठी गौरव घेऊन येतो. यंदा आपण सारे विक्रम मोडू आणि नवा इतिहास रचू, असा मला दृढ विश्वास आहे.

 मी स्वागताची वाट पाहीन

ऑलिम्पिकवरून परतल्यानंतर खेळाडूंच्या स्वागताची मी आवर्जून वाट पाहीन. माझा प्रयत्न असेल की, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनी आपण उपस्थित राहू शकाल. त्याक्षणी अवघा देश आपल्याला पाहू शकेल. ऑलिम्पिक खेळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या मते जय-पराजय एक वेगळी बाब आहे.

90 पेक्षा अधिक खेळाडू उपस्थित

पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात आज देशभरातून तब्बल 90 पेक्षा अधिक खेळाडू उपस्थित होते. यात सर्वच खेळातील स्टार खेळाडूंनी आवर्जून उपस्थिती लावली होती. येत्या 26 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत पॅरिसमध्ये सर्व खेळांचा पुंभमेळा रंगणार आहे.