
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते रा. स्व. संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देऊन प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. यानंतर दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व गौतम बुद्ध यांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते प्रचारक असा प्रवास असणाऱ्या मोदींनी ते पंतप्रधान झाल्यानंतर नागपूरमध्ये येऊनही संघभूमीवर जाणे टाळले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी विदर्भात आलेल्या मोदींचा मुक्काम नागपुरात राजभवनात होता, पण रेशीमबागेतील संघाचे स्मृती मंदिर किंवा महालातील संघ मुख्यालयात ते गेले नाहीत. संघभूमीला भेट देणारे मोदी दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी 2000 मध्ये भेट दिली होती.