
आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान आहे. साईबाबांना देवांचे स्थान दिलेले नाही. स्त्रीच्या भांगेत सिंदूर नसेल तर समजा प्लॉट रिकामा, अशी वादग्रस्त विधाने करणाऱ्या पंडित धीरेंद्र शास्ती ऊर्फ बागेश्वर बाबांसमोर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अक्षरशः नतमस्तक झाले. बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात मोदींनी बागेश्वर बाबांचे कौतुकही केले. माझे छोटे बंधू धीरेंद्र शास्त्राr हे लोकांना एकतेचे मंत्र पटवून देण्यासाठी जनजागृती करत आहेत. आता ते मानवता आणि समाजाच्या भल्यासाठी मोठे काम करत आहेत. कॅन्सर इन्स्टिटय़ूट उभारण्याचा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजेच बागेश्वर धाममध्ये तुम्हाला भजन, अन्न आणि निरोगी आयुष्यही लाभणार आहे, असे मोदी म्हणाले.
हिंदू धर्माचा तिरस्कार करणारे काही काळच राहतात
हिंदू धर्माचा तिरस्कार करणारे लोक काही काळच राहतात, असेही पंतप्रधान म्हणाले. गुलामीची मानसिकता असलेले लोक आपल्या श्रद्धेवर, मंदिर, धर्म, संस्कृती तत्त्वांवर हल्ला करतच असतात. आपले उत्सव, परंपरांची ते निंदा करतात. नैसर्गिकरीत्या पुरोगामी असलेल्या धर्म आणि संस्कृतीवर ते बेधडक हल्ला चढवत आहेत. समाजाचे विभाजन करत असून आपली एकता भंग करण्याचा त्यांचा अजेंडा असल्याची टीका मोदींनी केली.