गेल्याच वर्षी वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात तब्बल 156 जणांना जीव गमवावा लागला. हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकत आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र हवामान खात्यावरचा विश्वास बळावल्याचे म्हटले आहे. चक्रीवादळामुळे गेल्या 10 वर्षात जीवितहानी शून्य असून आजकाल व्हॉट्सअॅपवर हवामानाचे अपडेट्स येत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, वायनाड भूस्खलनात प्रचंड जीवितहानी झालेली असताना या नैसर्गिक आपत्तीबद्दल मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही. तसेच मृतांना नुकसानभरपाई देताना आणि येथील गायब झालेल्या गावांच्या पुनर्वसनाबद्दलही ते काहीच बोलले नाहीत. यावरून आता विरोधक मोदींना घेरण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला आज पंतप्रधान उपस्थित होते. आपल्या 25 मिनीटांच्या भाषणात त्यांनी आयएमडीचा विकास, त्याचे महत्व आणि आव्हाने याबद्दल सांगितले.
हवामान खात्याचे ऐकले आणि कार्यक्रम यशस्वी झाला
13 जानेवारी रोजी मी सोनमर्ग, जम्मू कश्मीरमध्ये होतो. कार्यक्रम आधी नियोजित होता. परंतु, हवामान खात्याने सांगितले की कार्यक्रम 13 जानेवारीला करा. मी काल दिवसा तिथे होतो. ढग एकदाही आले नाहीत. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीमुळे मी कार्यक्रम सहज पूर्ण करून परतलो, असे पंतप्रधान म्हणाले.
केंद्र म्हणाले होते वायनाड भूस्खलन राष्ट्रीय आपत्ती नाही
वायनाड भूस्खलन राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केली होती. परंतु, वायनाड भूस्खलन राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करता येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. तसेच केंद्राने वायनाडसाठी आर्थिक मदत देताना दुजाभाव केल्याचा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी केला होता. ही मदत अत्यंत तोकडी असून केंद्राचे हे वागणे अत्यंत क्रूर असल्याचे त्यांनी म्हटले होते.