गुजरातला गुंतवणूक वळवून पंतप्रधान मोदी विरोधी पक्षांची राज्य उद्ध्वस्त करताहेत; रेवंत रेड्डी यांचा हल्लाबोल

गुजरातला गुंतवणूक वळवून पंतप्रधान मोदी विरोधी पक्षांची राज्यं उद्ध्वस्त करत आहे, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले आहेत. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विरोधी पक्षशासित राज्यांसाठीची गुंतवणूक पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून गुजरातकडे वळवली जात आहे.

रेवंत रेड्डी म्हणाले की, ”2004 ते 2014 पर्यंत, सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. नरेंद्र मोदींनी त्या दहा वर्षांत गुजरात मॉडेलची जगभर जाहिरात केली. तत्कालीन केंद्र सरकारने मोदीजींना एवढा पाठिंबा दिला… प्रत्येक राज्य, मग ते विरोधी पक्षांचे राज्य असो वा नसो. विकासासाठी पाठिंबा दिला गेला. मग ते परवानग्या असोत, अर्थसंकल्पीय समर्थन असो, त्यामुळेच गुजरात मॉडेल निर्माण होऊ शकलं.”

पण आज नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना विरोधी पक्षांकडे दुर्लक्ष करत आहेत. विरोधी पक्षांची सर्व राज्ये उद्ध्वस्त करण्यासाठी ते आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत? हेच त्यांचं तेच गुजरात मॉडेल आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

रेवंत रेड्डी म्हणाले की, ”जर एखादा गुंतवणूकदार तेलंगणामध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाला तर, पीएमओ त्यांना गुजरातला जाण्यास सांगतो. ते हिंदुस्थानचे पंतप्रधान आहेत, पण मोदीजी गुजरातच्या पंतप्रधानांसारखे वागत आहेत. कारण त्याच्यासाठी प्रत्येक गुंतवणूक आणि प्रत्येक दृष्टिकोन… गुजरात आहे. आम्ही दहा वर्षे सत्तेत होते. पण गुजरातसाठी कोणतीही समस्या निर्माण केली नाही.”

रेड्डी पुढे म्हणाले, ”मोदीजी हिंदुस्थानला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याविषयी बोलतात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या विरोधी राज्यांना सोबत न घेता पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था कशी गाठणार? महाराष्ट्राशिवाय ते हे लक्ष्य कसं गाठणार? ही हिंदुस्थानची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रातून सतरा मोठ्या गुंतवणुका गुजरातमध्ये गेल्या आहेत. गुजरातचे हे मॉडेल देशासाठी धोकादायक आहे.”