जेवणाच्या टिफिनचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने फसवाफसवी, शेकडो महिलांना लावला चुना

मी मेट्रो, एल अॅण्ड टी, एमएमआरडीए अशा मोठय़ा ठिकाणी अधिकारी असून माझ्या हाताखाली शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना जेवणाच्या टिफिनची व्यवस्था करायची आहे. मी तुम्हाला टिफिनचे कंत्राट देतो अशी बतावणी करत टिफिन पुरविणाऱया महिलांकडून बँक खाते उघडण्याच्या नावाखाली हजारो रुपये घेऊन पसार होणारा सराईत भामटा टिळक नगर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्या आरोपीने अशा प्रकारे अनेक महिलांना चुना लावला असल्याचे समोर आले आहे.

चेंबूरच्या टिळक भावना इमारतीत राहणाऱया शीला मयेकर (60) या जेवणाचे टिफिन पुरविण्याचे काम करतात. त्यांच्याकडे एक व्यक्ती आली होती. मी बीएमसी तसेच एमएमआरडीएमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेवण पुरवितो. तुम्हाला टिफिन पुरविण्याचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगत त्याने मयेकर यांच्याकडे काही कागदपत्रे व फी म्हणून पैशांची मागणी केली. चांगले कंत्राट मिळतंय म्हणून त्यांनी त्या भामटय़ाला कागदपत्रे व 3500 रुपये दिले. त्याने मयेकर यांना बोलण्यात गुंतवून त्यांचा अॅपलचा महागडा फोन उचलून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मयेकर यांनी टिळक नगर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी निरीक्षक दत्तात्रय पाटील व निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल वाघमारे तसेच पोमणे, साटेलकर, सानप व गायकवाड या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व आरोपीच्या मोबाईल नंबरवरून तांत्रिक तपास करून शीव रेल्वे स्थानकातून संजयसिंग यादव (47) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुह्याची कबुली दिली.

चौकशी, थेट भेट, मग फसवणूक

संजय यादव हा कुठल्याही परिसरामध्ये फिरतो.जेवणाचे टिफिन बनवून देणाऱया महिला कोण आहेत, याची तो चौकशी करतो. माहिती मिळाल्यानंतर तो संबंधित महिलेकडे जातो. एमएमआरडीए, बीएमसी, मेट्रो, एल अॅण्ड टी अशा वाटेल त्या मोठय़ा संस्थेचे नाव घेऊन तेथे अधिकारी असल्याचे तो सांगतो. माझ्या हाताखाली शेकडो कर्मचारी कार्यरत असून त्यांना जेवणाच्या टिफिनची आवश्यकता आहे. तुम्ही काही प्रमाणात टिफिन देऊ शकत असाल तर तसे आम्ही तुम्हाला पंत्राट देतो, असे सांगून तो संबंधित महिलेला आपल्या मिठ्ठास वाणीने पंत्राट घेण्यास तयार करतो. समोरून होकार येताच कागदपत्रांची मागणी करून ऑनलाइन पेमेंटसाठी बँक खाते खोलण्याच्या बहाण्याने फी स्वरूपात काही रक्कम घेतो. मग तेथून पसार झाल्यावर मोबाईल बंद करतो. अशी त्याची मोड्स ऑपरेंडी असल्याचे पोलिसांनी सांगितले.