रशिया आणि युक्रेन शांतता करारासाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याची चिन्हे आहेत. शांतता करारासाठी तयार असल्याचा अतिशय स्ट्राँग सिग्नल रशियाकडून मिळाला आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्स्कीदेखील शांतता करारावर चर्चा करण्यासाठी तयार आहेत. तसेच खनिज आणि सुरक्षेसाठीच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठीही ते तयार आहेत, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीदरम्यान केलेल्या भाषणात केला.

काही दिवसांपूर्वी ओव्हल ऑफिसमध्ये झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनची लष्करी मदत तूर्तास रोखली होती. त्यानंतर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्यासोबत वादविवाद करणे चुकीचे होते, अशी प्रतिक्रिया दिली होती. आता ट्रम्प यांनी युक्रेनचे शांतता करारावर चर्चा करण्यास तयार असल्याचे पत्र मिळाल्याचे म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील रक्तरंजित संघर्ष थांबवण्यासाठी मी सातत्याने न थकता काम करत आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धात अनेक लोकांचा नाहक बळी गेला, तसेच अनेकजण जखमी झाले. त्यामुळे हा संघर्ष थांबवणे अत्यंत गरजेचे आहे, असे ट्रम्प म्हणाले.

युक्रेनी नागरिकांना केवळ शांतता हवी आहे

युक्रेनी नागरिकांना केवळ शांतता हवी आहे असे झेलेन्स्की यांनी पत्रात म्हटले आहे, असे ट्रम्प यांनी नमूद केले. शक्य तितक्या लवकर शांतता करारावर चर्चा व्हावी आणि युद्ध संपुष्टात यावे अशी युक्रेनची भूमिका असून त्यासाठी ते केव्हाही तयार आहेत, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, ट्रम्प यांच्या दबावानंतर झेलेन्स्की यांची भाषा बदलली. त्यांनी अमेरिकेसोबत खनिज करार करण्यावर सहमती दर्शवली आहे, तर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी शेवटपर्यंत युक्रेनची साथ देण्याचे आश्वासन दिले आहे.