मस्क यांच्या टेस्ला प्रोजेक्टमध्ये ट्रम्प यांचा खोडा, हिंदुस्थानात प्रकल्प उभारला तर अमेरिकेसाठी अयोग्य ठरेल

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे सहकारी एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच हिंदुस्थानात येणार असल्याची चर्चा आहे. अशातच ट्रम्प यांनी टेस्लाच्या प्रकल्पामध्ये खोडा घातला असून टेस्लाचा प्रकल्प हिंदुस्थानात उभारणे चुकीचे होईल, असे स्पष्ट केले. एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी या मुद्द्यावर प्रकाश टाकला. जर मस्क यांची टेस्ला हिंदुस्थानात प्रकल्प उभारून आयात शुल्क टाळत असेल तर ते अमेरिकेसाठी अयोग्य ठरेल, असे ट्रम्प म्हणाले. एकूणच मस्क यांचा निर्णय ट्रम्प यांना फारसा रुचलेला दिसत नाही.

अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. तेव्हा ट्रम्प यांनी हिंदुस्थानने लादलेल्या आयात शुल्कावरून नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी मुलाखतीत म्हटले की, प्रत्येक देश आमच्याकडून लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या देशातील कंपन्यांच्या उत्पादनांवर ते शुल्क आकारतात. त्यामुळे येथील कंपन्यांना व्यापार करताना अडचण होते. मस्क हिंदुस्थानात प्रकल्प उभारणार असतील तर ते केवळ त्यांच्यासाठी ठीक असेल. मात्र अमेरिकेसाठी हे योग्य होणार नाही. ते खूप चुकीचे असेल. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प सातत्याने अमेरिकन शुल्क वाढवण्यासाठी पावले उचलत आहेत.