![biren singh](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/biren-singh-696x447.jpg)
तब्बल 21 महिने रस्ते रक्तपाताने माखल्यानंतर आणि 250 बळी गेल्यानंतर अखेर एन बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावरून विरोधकांनी मणिपूर आणि मोदी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला. त्यामुळे विश्वास गमावण्याच्या भीतीने अखेर हिंसाचाराच्या आगीत पोळलेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आाली आहे.
प्रचंड हिंसाचारानंतर राष्ट्रपती राजवट-काँग्रेस
तब्बल 21 महिने हिंसाचार आणि विध्वंसाचा सामना केल्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आम्ही सातत्याने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती, परंतु तेव्हा हे पाऊल उचलण्यात आले नाही, असा हल्ला काँग्रेसने ‘एक्स’द्वारे मोदी सरकारवर केला आहे. येथील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. लोकांना शांतता हवी आहे, परंतु त्यांचे दुःख, अश्रू मोदी आणि त्यांच्या सरकारला दिसत नाहीत. मोदी आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळत आले आहेत, असा हल्ला काँग्रेसने केला आहे.
सीआरपीएफ जवानाकडून सहकाऱ्यांची हत्या
सीआरपीएफ जवानाने आपल्या दोन सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर स्वतःही गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना सीआरपीएफ पॅम्पमध्ये आज घडली. या घटनेत आणखी आठ जवान जखमी झाले इम्फाळ जिल्ह्यातील लाम्फेल येथे सीआरपीएफ पॅम्पमध्ये रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संजय कुमार असे या जवानाचे नाव असून तो 120 व्या बटालियनचा हवालदार होता. संजयने अचानक आपल्या सर्व्हीस रायफलमधून अंदाधुंद गोळीबार सुरू केला.