चीन नव्हे तर अमेरिकाच जगात महासत्ता राहणार, जो बायडेन यांचे परराष्ट्र धोरणावर शेवटचे भाषण चर्चेत

चीन अमेरिकेला कधीच मागे टाकू शकणार नाही. जगात अमेरिका हाच देश महासत्ता म्हणून कायम राहील, असा आशावाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला. त्यांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे परराष्ट्र धोरणावरील शेवटचे भाषण दिले. त्या वेळी ते बोलत होते.

अफगाणिस्तानातील युद्ध संपवणे हा अमेरिकेने घेतलेला योग्य निर्णय होता, असेही ते या वेळी म्हणाले. एकेकाळी तज्ज्ञ चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकेल असा अंदाज वर्तवत होते. आता चीन ज्या मार्गावर आहे, तो अमेरिकेला कधीच मागे टाकणार नाही, असे ते म्हणाले.

नवीन सरकारने चीनशी एकट्याने लढण्याऐवजी आपल्या मित्रपक्षांसोबत पुढे जावे. येत्या 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. आम्ही चीनसोबतचे संबंध अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळले. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत परस्पर संबंध कधीही संघर्षात बदलले नाहीत, असेही जो बायडने या वेळी म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्पचे नाव घेणे टाळले

बायडेन यांनी आपल्या भाषणात रशिया-युक्रेन युद्ध, गाझा युद्ध, चीन आणि इराणसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र संपूर्ण भाषणात त्यांनी एकदाही डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. गाझामधील युद्धविराम आणि ओलिसांची सुटका करण्याचा करार लवकरच यशस्वी होणार असल्याचा दावा बायडेन यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.