मिंधे सरकारची विशेष अधिवेशनाची तयारी? शिंदे-फडणवीस-अजित पवारांची राहुल नार्वेकरांशी चर्चा

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि सभापती निवडीच्या मुद्दय़ावर मिंधे सरकारची विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत विधिमंडळात बैठक झाली. त्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या महाराष्ट्र दौऱयाबाबत चर्चेच्या निमित्ताने ही बैठक झाल्याचे सांगितले जाते.

मराठा आरक्षण असो वा शेतकरी कर्जमाफी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर तोडगा काढायचा असेल तर राज्य सरकारला विशेष अधिवेशन बोलवावे लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मुद्दय़ांवर तोडगा काढावाच लागेल. नाहीतर त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत निश्चितच भोगावे लागणार याची जाणीव सरकारला झाली आहे. त्यामुळेच विशेष अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी शिंदे-फडणवीस-अजित पवार हे त्रिकूट आज विधिमंडळात राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे सांगितले जाते.