
पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शक्तिधाम रुग्णालयातही गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शांतीदेवी मौर्या (30) असे मृत महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे युरीन स्टोन ऑपरेशनसाठी शांतीदेवी यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. यातच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणाऱ्या शांतीदेवी दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या. चार दिवसांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास होता. मूतखड्याचे निदान झाल्याने उपचारासाठी शुक्रवारी कोळसेवाडी येथील केडीएमसीच्या शक्तिधाम रुग्णालयात महिलेला दाखल केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती काहीशी सुधारली. त्यानंतर त्यांचे मूतखड्याचे ऑपरेशन करायचे होते. सोमवारी शस्त्रक्रिया होती. मात्र प्रत्यक्षात डॉक्टरांनी कुटुंब नियोजन ऑपरेशन केल्याचा आरोप पती अखिलेश यांनी केला आहे. ऑपरेशनपूर्वी त्यांना भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर काही वेळातच त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे महिलेला खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णवाहिकेत नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत संताप व्यक्त केला.
केडीएमसीने आरोप फेटाळले; शल्यचिकित्सक चौकशी करणार
शांतीदेवी यांना युरीन स्टोन ऑपरेशनसाठी नव्हे तर गर्भपात व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी कुटुंबीयांनी दाखल केले होते. तसा फॉर्मही भरून घेतला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली. शस्त्रक्रियेपूर्वी भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना असून ठाणे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचेही शुक्ल यांनी सांगितले.
शिवसेना, काँग्रेसची निदर्शने कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेदरम्यान
शांतीदेवी मौर्या या महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस तसेच विविध संघटनांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित जागेवर हॉस्पिटल बांधून एका संस्थेला ठेका देण्यात आला. नियोजनशून्य कारभार आणि निष्काळजीपणा यामुळेच महिलेचा बळी गेला. त्यामुळे वेस्टर्न हेल्थकेअर कन्सल्टंसीचा ठेका रद्द करावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, कल्याण पूर्व शहरप्रमुख शरद पाटील, युवासेनेचे शहर अधिकारी अॅड. नीरज कुमार, मीना माळवे, आशा रसाळ, हेमंत चौधरी, समीर वेदपाठक, अरुण निंबाळकर, अशोक पांडगळे, संगीता गांधी यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.