एचएमपीव्ही रोखण्यासाठी सरकारला खबरदारीचे निर्देश द्या, उच्च न्यायालयात वकिलाची याचिका

चीनमध्ये थैमान घातलेल्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने (एचएमपीव्ही) हिंदुस्थानलाही धडकी भरवली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये या विषाणूचे रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका वकिलाने याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने नवीन विषाणूच्या फैलावाची दखल घ्यावी आणि राज्य सरकारला खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी केली आहे. 2020 मध्ये उच्च न्यायालयाने कोरोना महामारीची स्वतःहून दखल घेतली होती. सध्या जगभर फैलावत असलेल्या एचएमपीव्हीचा संसर्ग रोखण्यासाठीही न्यायालयाने तशाच प्रकारे हस्तक्षेप करून सरकारला निर्देश देण्याची गरज आहे, असे अॅड. भांडारकर यांनी याचिकेत म्हटले आहे.

नागपूरमध्ये संशयित रुग्णांची चाचणी करणार

नागपूर महापालिकेने संशयित रुग्णांची चाचणी करण्याच्या अनुषंगाने कंबर कसली आहे. या रुग्णांचे नमुने घेतले जाणार असून त्यांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून विषाणूच्या जनुकीय बदलाबाबत माहिती मिळू शकणार आहे.